
अहमदनगर दि. ६ मार्च ( प्रतिनिधी : मागील सुमारे दोन आठवड्यांपासून शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये मनपाची कचरा संकलन घंटागाडी पोहोचलेली नाही. यामुळे नागरिकांच्या घरात कचरा साचला असून त्याची दुर्गंधी त्यांना सहन करावी लागत आहे. स्थानिक नगरसेवक, मनपा कर्मचारी, ठेकेदार प्रतिनिधी नागरिकांना फोन करून देखील कोणतीही दाद द्यायला तयार नाहीत. मनपाच्या कोलमडलेल्या यंत्रणेचा निषेध म्हणून नागरिकांनी आज (दि. ६) कचऱ्याची होळी करावी, असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांना केले आहे.
काळे म्हणाले की, आज होळीचा सण आहे. पण ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांच्या घरांमध्ये कचऱ्यांचे ढीग लागले आहेत. घंटागाडीत मागील दोन आठवड्यांपासून दारात आलेली नाही. यामुळे विशेषतः महिला वर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. इच्छा नसतानाही नागरिकांना रात्रीच्या वेळी नाईलाज म्हणून रस्त्यांवर कचरा टाकावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापूर्वी स्वयंभू संस्थेकडे हा ठेका होता. अपहाराचा गुन्हा या संस्थेवर काही महिन्यांपूर्वी दाखल झाला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा ठेका गुजरातच्या एका कंपनीला देण्यात आला आहे. मात्र या कंपनीकडून कामाची चाल ढकल होत असून घंटागाड्या शहरातून गायब झाल्या आहेत. महापालिकेने फाईव्ह स्टार मानांकन मिळविल्याचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र मनपाचा हा दावा किती फोल आहे याची प्रचिती नगरकरांना येत असून हेच का मनपाचे फाईव्ह स्टार मानांकन ? असा संतप्त सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
काळे म्हणाले की, ठेका गुजरातच्या कंपनीला दिला गेला असला तरी हा ठेका नगरच्या एका राजकीय बड्या नेत्याचे कार्यकर्ते चालवत आहेत. देण्याघेण्यावरून त्यांचे फिस्कटके आहे. त्यामुळे त्यांनी अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केलेली नाही. मनपाने सक्षम नसतानाही सदर कंपनीला ठेका दिला आहे. उत्तम दर्जाच्या कामासाठी देशभर सुप्रसिद्ध असणाऱ्या बीव्हीजी कंपनीने यासाठी निविदा भरली होती. मात्र शुल्लक कारण पुढे करत जाणीवपूर्वक त्यांना या प्रक्रियेतून बाद करत नगरकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
काँग्रेस करणार कचऱ्याची होळी :
दरम्यान मनपाच्या ढिसाळ कारभाराबाबत आज सायंकाळी काँग्रेस शहरात कचऱ्याची होळी करणार असून यावेळी मनपाच्या नावाने बोंबाबोंब आंदोलन करणार आहे. नागरिकांनीही मनपाचा निषेध म्हणून आपापल्या दारासमोर कचऱ्याची होळी करत मनपाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलन करावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.