नगरच्या पत्रकारांची भाजपने माफी मागावी ; अन्यथा काँग्रेस पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल – किरण काळे

अहमदनगर दि.25 सप्टेंबर (प्रतिनिधी ): पत्रकारांनी २०२४ पर्यंत भाजपच्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना धाब्यावर जेवायला घेऊन जा. महिन्यातून एकदा त्यांना चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला म्हणजे काय तुम्हाला समजलेच असेल. त्यात काही कमी जास्त झालं तर सुजय विखे आहेतच. असं म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळेंवर शहर काँग्रेसने चांगलाच हल्लाबोल केला आहे. नगरच्या पत्रकारांना भाजप विकाऊ समजते काय ? भाजप नेत्यांनी त्यांच्या संस्कृतीचे घाणेरडे प्रदर्शन केले असल्याचा आरोप करत भाजप खा. सुजय विखे पाटील यांनी तात्काळ नगरच्या पत्रकारांची माफी मागावी. अन्यथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर काळेंनी चांगला संताप व्यक्त केला आहे. काळे म्हणाले, पत्रकार आणि प्रसार माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. अहमदनगरच्या पत्रकारितेला मोठा वारसा आहे. परंपरा आहे. अनेक नामांकित पत्रकार या शहराने आणि जिल्ह्याने राज्याला दिलेले आहेत. अशा पद्धतीचे वक्तव्य करून पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचे काम भाजपने केले आहे. निवडणुकांच्या वेळी पार्ट्या देणे, दारू पाजणे, मतदारांना देवदर्शनाची, पैशांची प्रलोभने दाखवणे ही भाजपची संस्कृती आहे.
जे त्यांच्या मनात आहे ते त्यांच्या ओठांवर आले आहे. याच्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. नगरच्या पत्रकारांबद्दल जे भाजप प्रदेशाध्यक्षांचे मत आहे तेच भाजप खा.सुजय विखे यांचे देखील आहे काय, हे त्यांनी तात्काळ स्पष्ट करावे. भाजपने नगरच्या पत्रकारांवर घाणेरडे शिंतोडे उडवण्याचे काम केले आहे. याबद्दल विखेंनी तात्काळ नगरच्या पत्रकारांची माफी मागावी. अन्यथा भाजप पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.
नगर शहरातील घर चलो अभियान ही केवळ नौटंकी होती. शहरातले व्यापारी, नागरिक तर दूरच पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांचे शक्ती प्रदर्शन फसले. शहरात शक्तीहीन झालेल्या भाजपचे पितळ उघडे पडले. अशा वेळी हे वास्तव प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोर्टल मीडिया यांच्या माध्यमातून समाजासमोर, मतदारांसमोर येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजायला बोलवा, ढाब्यावर जेऊ घाला, असा अजब सल्ला देऊन भाजपची घटलेली लोकप्रियता समाजासमोर येऊ नये यासाठी पत्रकारांवर शिंतोडे उडवण्याचा प्रताप भाजपने केला आहे. याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.