तंबाखुच्या व्यसनापासुन मुक्तीसाठी समुपदेशन केंद्राशी संपर्क साधावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांचे आवाहन

अहमदनगर, दि.26 ऑगस्ट (प्रतिनिधी) – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने कायदा 2003 केंद्र सरकारने देशभरामध्ये लागू केला आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची स्थापनाही करण्यात आली आहे. तंबाखूवर नियंत्रणासाठी शासनामार्फत अनेक उपक्रमही राबविण्यात येत आहेत. तंबाखू सेवनापासून नागरिकांनी दूर रहावे यासाठी ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात समुपदेशन केंद्र कार्यान्वित आहेत. नागरिकांनी आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी व तंबाखूच्या व्यसनापासुन दूर रहावे. तसेच तंबाखुच्या व्यसनापासुन मुक्तीसाठी समुपदेशन केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी केले आहे.
जगामध्ये तंबाखु सेवनामुळे कर्करोग होऊन अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंञणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होणा़-या आजारामुळे होतो. भारत सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंञालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंञण कार्यक्रम सुरु करण्यात आला. आपल्या जिल्ह्यातसुद्धा हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येऊन तंबाखू सेवनापासुन नागरिकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील 23 ग्रामीण रुग्णालयांमध्ये तसेच विखे पाटील रुग्णालय,विळद या ठिकाणीही तंबाखूमुक्ती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रातून तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींचे समुपदेशन करण्यात येऊन तंबाखुमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करुन देण्यात येते. या केंद्राच्या माध्यमातुन आजपर्यात 43 हजार 488 नागरिकांची नोंदणी करण्यात आली असुन 36 हजार 282 नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. यामध्ये 246 नागरिकांनी तंबाखुचे सेवन करणे सोडुन दिले आहे.
आजची पिढी ही उद्याच्या उज्वल देशाचे भविष्य आहे. तरुणांनी या व्यसनापासुन दुर राहुन आपले आरोग्य सदृढ राहील यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनामार्फत तंबाखुमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा लाभ घ्यावा. तंबाखुमुक्तीसाठी ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखूमुक्ती केंद्राशी संपर्क साधावा.