कामात तन, मन आणि आत्मा ओतल्याशिवाय रुग्णसेवा अशक्य : डॉ. उद्धव शिंदे स्नेहबंधतर्फे डॉ. अमित बडवे यांचा सत्कार

अहमदनगर दि. १९ मे (प्रतिनिधी) – आरोग्य सेवेच्या क्षेत्रात श्रीदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. अमित बडवे हे झोकून देऊन काम करीत आहे. तन, मन आणि आत्मा कामात ओतल्याशिवाय अशी अखंड रुग्णसेवा करता येणे अशक्य आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
श्रीदीप हॉस्पिटलचे संचालक अस्थिरोग तज्ञ डॉ. अमित बडवे यांचे आरोग्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल स्नेहबंधच्या वतीने डॉ. अमित बडवे व स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीरा बडवे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ. शिंदे बोलत होते. याप्रसंगी मायादेवी अॅबॅट हायस्कूलचे प्राचार्य व्ही. एल. नरवडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, छावणी परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे, अभिजित ढाकणे उपस्थित होते. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, व्यावसायिक दृष्टी बाजुला ठेवून रुग्णसेवा करणे हाच धर्म आहे. तेच काम डॉ. बडवे करत आहेत. डॉ. बडवे यांनी नुकतेच गरिब रुग्णावर मोफत उपचार केले, असे अशक्य कोटीतील काम अपवाद वगळता कोणताही डॉक्टर करत नसावा. गरिबांवर मोफत उपचार करूनही उर्वरित लोकांच्या सेवेतून स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक पैसे कमवता येतात, हे डॉ. बडवे यांनी दाखवून दिले. त्यामुळे ते समाजसेवा करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी प्रेरणा आहेत. डॉ. बडवे म्हणाले, वाजवी पैसे घेऊनही दर्जेदार उपचार, रुग्णसेवा देता येते. आधुनिक तंत्रज्ञान वापरत असल्यानेच आम्ही अधिक रुग्णांपर्यंत पोचू शकलो. रुग्ण गरीब असो की श्रीमंत आम्ही गुणवत्तेत तडजोड करत नाही.