
अहमदनगर दि. ३० मे (प्रतिनिधी) : शहरातील अनेक वर्ष रखडलेल्या व बहुचर्चित असणाऱ्या उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याचे लोकार्पण देखील झाले आहे. या कालावधीत जड वाहनांच्या वाहतुकीसह नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणासाठी सारसनगरच्या प्रभाग १४ मधील अंतर्गत रस्त्यांचा पर्याय दिला होता. मनपा हद्दीतील या रस्त्यांचा या काळात मोठ्या प्रमाणावर वापर झाला. यामुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मात्र मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नगरसेवक तसेच शहराचे लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांची कामे तातडीने करा, अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
शहर काँग्रेसच्या वतीने याबाबतचे लेखी निवेदन मनपा आयुक्त पंकज जावळेंना देण्यात आले आहे. तसेच एके वन सोसायटी समोर काही महिन्यांपूर्वी झालेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा प्रताप केलेल्या मनपा अभियंते आणि ठेकेदारांची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली आहे. निकृष्ट काम करत जनतेचे पैसे अशा पद्धतीने लुटणाऱ्यांची बिले अदा करू नयेत. भ्रष्टाचाराच्या हेतूने संगनमत करत केलेल्या चुकीच्या कामाबद्दल अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी. तसेच काँक्रीटकरणाचे बिल यापूर्वी अदा केले असल्यास सदर पैशाची वसुली मनपा अभियंते व ठेकेदाराकडून संयुक्तरित्या करण्यात यावी, अशी मागणी काळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. या कामाचा ठेकेदार हा याच प्रभागातील एका नगरसेवकाचा भागीदार असून नगरसेवकच अशी निकृष्ट कामे करत असेल तर नागरिकांनी अशा भ्रष्ट नगरसेवकांना पुन्हा निवडून देऊ नये, असे आवाहन काळे यांनी केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चाणक्य चौक ते आयटीआय कॉलेज गेट ते एके वन सोसायटी ते एमएसईबी कॉलनी ते आनंदऋषीजी हॉस्पिटल या मार्गाने उड्डाणपूल उभारणी काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे रस्ते मनपा हद्दीतील आहेत. हे रस्ते व्हावेत यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रभागातील चारही नगरसेवकांकडे तसेच शहर लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून देखील या रस्त्यांच्या दुरावस्थेची कोणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने याबाबत पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था पाहता तातडीने या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घ्यावीत, असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, हा दाट नागरी वस्तीचा भाग आहे. जवळच आनंदऋषीजी हॉस्पिटल, गुंजाळ हॉस्पिटल अशा वैद्यकीय आस्थापना आहेत. तसेच छोट्या-मोठ्या शाळा, लहान मुलांच्या नर्सरी, दवाखाने, मंदिरे आहेत. त्यामुळे या भागात मोठी वर्दळ असते. जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना नागरिकांची कसरत होते. यातून अनेक अपघात होतात. वास्तविक पाहता प्राप्त माहितीनुसार उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम पूर्ण होताच वापरण्यात आलेल्या पर्यायी रस्त्याचे काम करून दिले जाईल, असे सांगितले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने अजूनही अंतर्गत रस्त्यांची कामे केली नाहीत.
याच भागातील एकेवन सोसायटी समोरील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केल्याचा मनपाचा प्रताप नुकताच काँग्रेसने भांडाफोड करत नगरकरांसमोर उजेडात आणला होता. त्या पार्श्वभूमीवर काळे म्हणाले की, कामे करत असताना ती दर्जाहीन करू नये. असे केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.