सामाजिक

दरवाढ निर्णय मलबजावणीच्या लेखी आश्वासनानंतर रेल्वे मालधक्का कामगारांचं उपोषण स्थगित ; शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंची यशस्वी मध्यस्थी

अहमदनगर दि. १८ मार्च (प्रतिनिधी) : अखेर चौथ्या दिवशी रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांचे उपोषण एक महिन्याच्या आत दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त आणि कामगार यांच्यामध्ये शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यशस्वी मध्यस्थी करत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने कामगारांनी एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले असल्याची माहिती कामगार प्रतिनिधी सुनील भिंगारदिवे, विलास उबाळे यांनी दिली आहे.
गुरुवारी दुपारी प्रशासन आणि कामगार यांच्यामध्ये काळे यांच्या मध्यस्तीने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने लेखी आश्वासनाचे पत्र कामगारांना दिले. मात्र कामगारांनी ते स्वीकारण्यास नकार दिला. सदर पत्रामध्ये प्रत्यक्ष आंदोलनकर्ते यांना बाजूला ठेवत माल वाहतूक संघटना, हुंडेकरी व मुकादम यांची बैठक घेण्यात येईल असे म्हटले होते. मात्र कामगारांनी याला जोरदार आक्षेप घेत जे या ठिकाणी आंदोलनाला बसलेले नाही ते आणि कोणतीही अन्य कामगार संघटनेच्या एकाही पदाधिकाऱ्याने मागील तीन दिवसांमध्ये आंदोलनकर्त्यांची साधी भेट सुद्धा घेतलेली नाही, विचारपूस केली नाही. त्यांना बैठकीला बोलावण्याचा काय संबंध ? असा संतप्त सवाल करत पत्र घेण्यास नकार दिला. दरम्यान, कामगारांचा रोष पाहता सदर बैठक रद्द करण्यात आल्याचे पत्र मंडळाने शुक्रवारी सकाळी निर्गमित केले.
काळे यांनी यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त कवले यांना चांगलेच धारेवर धरत कामगारांची दिशाभूल थांबवण्याची मागणी केली. शेवटी कामगारांना अपेक्षित लेखी आश्वासनाचे पत्र देत असताना दिशाभूल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री ८.३० वाजता आंदोलन चालू ठेवायचा निर्णय कामगारांनी घेतला. शुक्रवारी सकाळी पुन्हा काळे यांनी कामगारांच्या वतीने प्रशासनाशी संवाद साधला. त्यानंतर कार्यालयाचे अधिकारी प्रदीप जगधने हे लेखी आश्वासनाचे पत्र घेऊन आंदोलन स्थळी उपस्थित झाले.
यावेळी मंडळाच्या दरवाढीच्या यापूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी पुढील एक महिन्यांच्या आत करण्यात येईल.आंदोलन तात्काळ स्थगित करावे, असे पत्र मंडळाने दिले. यावेळी कामगारांनी एकच जल्लोष केला. यावेळी बोलताना आंदोलनाचे नेतृत्व करणारे कामगार प्रतिनिधी सुनील भिंगारदिवे, विलास उबाळे म्हणाले की, ज्यांच्यावर कामगारांनी आजवर विश्वास टाकला त्यांनी कामगारांच्या हिताचा विचार न करता अधिकारी, ठेकेदार, हुंडेकरी यांच्याशी कामगारांना विश्वासात न घेता संगनमत केले. मात्र इथून पुढच्या काळात काळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या हक्काची लढाई अधिक तीव्रपणे लढली जाईल. दिलेले आश्वासन मंडळाने पूर्ण केले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
किरण काळे म्हणाले की, मंडळाने न्यायालयात दोन वर्षांपूर्वी लेखी देऊनही स्वतःच्याच निर्णयाची अंमलबजावणी न करणे हे म्हणजे न्यायालयाचा अवमान केल्यास सारखे आहे. मात्र आता मंडळाने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून कामगारांनी पुन्हा कामावर परतत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न भविष्यात झाल्यास कामगारांच्या पाठीशी काँग्रेस ताकदीने उभी राहील.
यावेळी ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते, अलतमश जरीवाला, युवक सरचिटणीस आकाश अल्हाट, वंचित आघाडीचे प्रतीक बारसे, जयराम आखाडे, गौतम सैंदाणे, दीपक काकडे, वैभव पाडाळे, नितीन सूर्यवंशी, सचिन कांबळे, गणपत पाटील, अभिजीत पुंड, नाना बोरुडे, सतीश कांबळे, राधेश भालेराव, बाबा हजारे, संतोष निरभवणे, बाबासाहेब वैरागर, विनोद केदारे, अमर डाके, रुपेश सुळे, सचिन वाघमारे, शिवा साबळे, संदीप कार्ले, नाना दळवी आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे