यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात अहमदनगर न्यायालयाचे कारवाईचे आदेश
अॅड असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली
अहमदनगर (प्रतिनिधी)- धर्मांध यती नरसिंहानंद सरस्वती याच्याविरोधात फौजदारी प्रक्रियेच्या 156 (3) नुसार कार्यवाही करण्याचे आदेश अहमदनगरच्या न्यायालयाने 25 जानेवारी 2022 रोजी पारित केले. तक्रारदारांतर्फे अॅड.असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली व धर्मांध, विषारी प्रक्रिया कशी वाढते आहे? आणि कायद्याने अश्या प्रवृत्तींना प्रतिबंध करणे कसे शक्य असल्याचे युक्तीवादात मांडले.
कट्टरवादी व विषारी अविचार-प्रचारक यती नरसिंहानंद सरस्वती याच्या विरोधात 23 जुलै 2021 रोजी दाखल केलेल्या खाजगी फौजदारी तक्रार अर्जाची दखल घेऊन सात महिन्यांच्या दीर्घ कालावधी नंतर अहमदनगर प्रथमश्रेणी न्यायाधीश टी. एम. निराळे यांचे न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. हा लोकशाही रक्षणासाठी कार्यरत लोकांचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख व कॉ. अनंत लोखंडे यांनी दिली आहे.
यु-ट्युब वरील दुर्देवी व्हीडीओ पहिल्यानंतर अनेक अपेक्षा घेऊन अहमदनगरच्या जागरूक नागरिकांनी यती नरसिंहनंद सरस्वती याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पण अहमदनगर पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. म्हणून यती नरसिंहानंद सरस्वती या प्रक्षोभक विधाने करणार्या व्यक्ती विरुद्ध अहमदनगर येथील न्यायालयात जुलै 2021 मध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये अलिगढ उत्तर प्रदेश येथे आयोजित यती सरस्वती यांनी देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना देशातील मुख्य जिहादी संबोधून समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे गुन्हेगारी स्वरूपाची अनेक वक्तव्ये जाणीवपूर्वक केली होती. ही वक्तव्ये देशाच्या एकात्मतेस व मानवतेस धोका निर्माण करणारी होती. यती नरसिंहानंद सरस्वतीच्या अनेक धर्मांध वक्तव्यांची दखल देशातील विविध भागातील पोलिस प्रशासनाने घेतली आहे. कायद्याच्या प्रक्रियांना होणारा विलंब हा नवीन नसला तरीही जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणार्या व आपण कायद्यापेक्षा वरचढ आहोत अशी भावना घेऊन जगणार्यांच्या विरोधात तरी कायद्याचे हात मजबुतीने व त्वरित कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यती नरसिंहानंद सरस्वती सारख्या अमानुष व धर्मांध माणसाला वेळीच अहमदनगर जिल्ह्यात कायद्याची वेसन घालण्यात आली असती तर त्याने हरिद्वार येथे धर्म-संसद भरवून धुडघूस घालून देशभर धर्मद्रोही वातावरण तयार केले नसते. उशिरा का होईना आता न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीस पुढची कारवाई कुणाच्या दबावाखाली न येता करतील अशी अपेक्षा अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
तक्रारदारांनी असे मत मांडले की, देशात अचानकपणे वाढलेल्या द्वेषमुलक वक्तव्याचे हे पूर्वनियोजित संपूर्ण राष्ट्राविरोधी कारस्थान आहे. ज्याचा उद्देश महापुरुष आणि राष्ट्राच्या आदर्श पुरुषांच्या प्रतिमा मलीन करून देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा उचलणे हा आहे. या अश्या घटनांमुळे यती नरसिंहनंद सरस्वती सारख्या मानसिकता असणार्या लोकांना धर्म संसदेसारख्या विध्वंसक विचाराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास पाठबळ मिळत आहे. न्यायलयाने दिलेल्या या आदेशामुळे द्वेषमुलक वक्तव्य करणार्यांवर नक्कीच चाप बसेल. तक्रारदार हे हिंदू तसेच मुस्लीम या दोन्ही समाजातील आहेत हे विशेष. हिंदू ,मुस्लीम आणि इतर कुठल्याही समाजातील असंविधानिक कृत्य करणार्या आणि मुलतत्ववादी विचाराच्या प्रत्येकालाच शिक्षा झाली पाहिजे असेही त्यांचे म्हणणे आहे. या वेळी तक्रारदार बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख आणि अनंत लोखंडे समवेत तक्रारदारांचे वकील अॅड. असीम सरोदे व त्यांची लीगल टिम अॅड. मदन कुर्हे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. सुनयना मुंडे, नालंदा आचार्य, अभिजित घुले, रेश्मा गोखले, अस्मा क्षीरसागर, सिद्धी जागडे, ऋषिकेश शिंदे, मेखला गांगुर्डे यांनी या प्रकरणा संदर्भातील रिसर्च साठी महत्वाचे कायदेशीर काम केले. या व्यतिरिक्त अॅड. फारुख बिलाल शेख, अॅड. इरफान शेख व अॅड. साकिब शेख यांनी सहकार्य केले.