संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेमुळे ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणास बळ -मंत्री धनंजय मुंडे
जामखेड येथील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन व विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मंजूरी आदेश वाटप

अहमदनगर, दि.२६ (प्रतिनिधी) – ऊसतोड कामगारांचे महाराष्ट्रात मुला-मुलींचे दुसरे वसतिगृह जामखेड येथे सुरू केल्याने परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यास बळ मिळणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या जामखेड जामखेड येथील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन व शासनाच्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थीं यांना लाभ मंजूरी आदेश वाटप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार रोहित पवार, कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानिक मूल्यांवर राज्याचा सामाजिक न्याय विभाग काम करत आहे. ऊसतोड कामगारांची मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. यासाठी शासनाने मागील वर्षी संत भगवानबाबा वसतिगृह योजना सुरू केली.
विशेष सहाय्य योजनेच्या माध्यमातून शासनाने वंचित, गरजू लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून दिली.असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, कर्जत येथे मिशन वात्सल्य अंतर्गत कोरोना मुळे कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल व विधवा झालेल्या महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी मिशन वात्सल्य बाल संगोपन मेळावा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. बाल संगोपन मेळाव्यास शासनाचे महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन, कृषी, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण व स्वयंसेवी संस्था, सहभागी झाल्या होत्या.