श्री आनंद महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दीन उत्साहात संपन्न!

पाथर्डी दि. २८ जानेवारी (प्रतिनधी)
‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे एका एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहू शकतो व त्यासाठीच प्रत्येक व्यक्तीने मतदान करून मतदानाचा हक्क बजावण्या सोबतच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उचलावा, असे प्रतिपादन श्री आनंद कॉलेज पाथर्डी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. देशाच्या विविधांगी विकासाला गती देण्यास या देशाचे नागरिक म्हणून अधिकाधिक तरुणांनी मतदानासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयात आयोगाच्या ‘निवडणुका सर्वसमावेशक प्रवेशयोग्य आणि सहभागी बनवणे’ या विषयावर आधारित निबंध लेखन, पोस्टर, व रांगोळी अश्या विविध आयोजित स्पर्धांचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी मा. संजय माळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सदर कार्यक्रमास पाथर्डी तालुक्याचे नायब तहसीलदार मा. श्री संजय माळी तसेच मा. बाबासाहेब वामन, विषयतज्ञ, शिक्षण विभाग पंचायत समिती पाथर्डी, कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख सर, महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मुक्तार शेख, प्रा. डॉ. जगन्नाथ बरशिले, डॉ. घोरपडे, डॉ. अशोक वैद्य, प्रा. डॉ. विकास गाडे, प्रा. डॉ. नितीन ढूमने, प्रा. अनिता पावसे सह विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना मा. बाबासाहेब वामन यांनी नमूद केले की आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असुन मतदार हे लोकशहीला बळकट करण्याचे काम करतात. मतदानाचा हक्क बजावणे म्हणजेच राष्ट्रीय कर्तव्य बजावणे असेही मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. मनिषा सानप यांनीही विद्यार्थ्याना मतदार जनजागृती या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पुढे विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वितरीत करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी मतदार शपथही घेतली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. जयश्री खेडकर यांनी केले, व प्रा. सुर्यकांत काळोखे यांनी आभार मानले.