निंबोडी शाळा दुर्घटने नंतरही झोपलेल्या भ्रष्ट बांधकाम विभागाचे, शाळा खोल्या बांधकाम तसेच निर्लेखनाकडे असणारे दुर्लक्ष असल्याचा आरोप! जन आधार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा दलाली व ढिसाळ कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन!

अहमदनगर (प्रतिनिधी)- जन आधार संघटनेच्या वतीने निंबोडी शाळा दुर्घटने नंतरही झोपलेल्या भ्रष्ट बांधकाम विभागाचे, शाळा खोल्या बांधकाम तसेच निर्लेखनाकडे असणारे दुर्लक्षाच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देऊन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे यांच्या दालनात ठिया आंदोलन करताना जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, दीपक गुगळे, शहानवाज शेख, फैजान शेख, निलेश सातपुते, विजय मिसाळ, गौतमी भिंगारदिवे, आरती शेलार, हिराबाई भिंगारदिवे, मंगल पालवे, सुनीता भिंगारदिवे, रंजना भिंगारदिवे, किरण जावळे, संतोष डमाळे, आनंद खिवसरा, रेखा डोळस, लता बर्डे, आकाश गुंजाळ, दत्ता पाटील आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दोन महिन्यांपूर्वी दहिगाव येथील केवळ 12 वर्षांपूर्वी बांधकाम झालेल्या 7 वर्ग खोल्यांची आजची स्थिती अत्यंत खराब असून तिला तडे गेलेले आहेत, याबाबत आपल्याला लेखी कळवून देखील. त्याच प्रमाणे या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे, जेणेकरून ही इमारत मुलांना बसण्या योग्य आहे की नाही याबाबत निर्णय होईल आणि इमारतीचे बांधकाम ऑडिट योग्य आल्यास इमारतीची दुरुस्ती व्हावी या बाबत आपण पंधरा दिवसाच्या आत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती, मात्र आपण अद्याप पर्यंत या बाबत कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नसून आपल्या बांधकाम विभागाची शासकीय शिक्षणा प्रति असणारी उदासीनता यातून दिसून येत आहे. त्याच प्रमाणे बायजाबाई जेऊर (ता.नगर) येथील तवले वस्ती जिल्हापरिषद शाळा येथे जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये विद्यार्थी बसत आहेत त्या दोन्हीही वर्गखोल्या पडण्याच्या स्थितीत असल्याने कधीही कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडून मुलांच्या जीवितास बरे वाईट होऊ शकते हे देखील आम्ही आपल्याला मागील दोन महिन्यापूर्वी कळवलेले असताना देखील आपल्या विभागामार्फत सातत्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच त्याच ठिकाणी जेऊर मध्ये या मुलांना मंजूर झालेली वर्ग खोली देखील इतरत्र ठिकाणी हलवली गेली. उद्या काही बरे वाईट झाल्यास आपण हात झटकून मोकळे होताल,पण जीव जाईल तो एखाद्या गरिबाच्या मुलाचा. तसेच निंबोडी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा स्लॅब गळत असल्याने त्या ठिकाणी जवळपास 13 लक्ष रुपये खर्च करून वॉटरप्रूफिंग करण्यात आली, हे संपूर्ण काम तांत्रिकदृष्ट्या योग्य कस होईल याकडे आम्ही,शालेय व्यवस्थापन तसेच ग्रामस्थांच्या वतीने लक्ष पूर्वक काम करून घेण्यात आलं. हे काम योग्य पद्धतीने होऊन पूर्ण होऊन देखील आपल्या विभागातील काही अधिकारी त्या ठेकेदाराला त्याची अडवणूक करून त्याला पैसे मागत आहेत त्या ठेकेदाराने सर्व तांत्रिक गोष्टींचे तंतोतंत पालन करून अतिशय व्यवस्थित काम केलेले असताना देखील केवळ काही पैशाच्या हव्यासापोटी त्याची पिळवणूक होऊन त्याला बिल अदा करण्यात येत नाही. असे घडल्यास पुन्हा यानंतर कुठला ठेकेदार व्यवस्थित काम करेल का ? हा देखील मुद्दा उपस्थित होतोय. तसेच सुमारे सहा महिन्यापूर्वी पारगाव फाटा ते पारेवाडी या बाराशे मीटर रोडचे काम 30 लाख रु. खर्चून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आले तो रस्ता तर मात्र तीन महिन्यात पूर्णपणे गायब झालेला आहे याबाबत देखील आपल्या विभागाला कळवले असता त्यांनी मला लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले होते की पावसाळा गेला की आम्ही काम व्यवस्थित करू, परंतु पावसाळा संपून दोन महिने होऊन देखील त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही दिसून येत नाही, आणि याच खराब आणि जीवघेण्या रोडवरून सर्वसामान्य लोक प्रवास करत आहेत .याचा एकच अर्थ निघत आहे की जील्हा परिषद बांधकाम विभाग फक्त पैसे कमावण्याच्या मार्गावर आहे, त्यांना कामाच्या गुणवत्तेचे काही देणे घेणे नाहीये हे यातून दिसून येते. परंतु असेच चालू राहिल्यास आणि आपल्या विभागाने वरील तिन्ही प्रकरणात लक्ष न दिल्यास,या पुढेही शाळेच्या बांधकामा विषयी तसेच रस्त्यांच्या गुणवत्ते विषयी आपल्या विभागाचे धोरण असेच सुरू राहिले तर जन आधार संघटनेच्या वतीने जिल्हापरिषद बांधकाम (दक्षिण) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना येणाऱ्या 10 दिवसां नंतर काळे फासणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.