अवैध मद्यविक्री, वाहतुक व अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींवर उत्पादन शुल्क विभाग करणार कारवाई अवैध मद्याची विक्री, निर्मिती तसेच वाहतुक होत असल्यास माहिती देण्याचे आवाहन

अहमदनगर दि.28 डिसेंबर (प्रतिनिधी)
:- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने केले जाते. या कालावधीमध्ये अवैध, परराज्यातील, बनावट मद्यविक्रीची शक्यता लक्षात घेता ते रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नियोजन करण्यात आलेले असून या अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच अवैध ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यकारी अधिकारी, व भरारी पथके तसेच अकार्यकारी घटकावरील काही अधिकारी यांची आठ विशेष पथके जिल्हयात नेमली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने रात्रगस्त घालण्यात येणार आहे. या पथकाद्वारे या कालावधीत रात्र गस्त तसेच बेकायदेशीर मद्यविक्री होऊ नये यासाठी कारवाई करणार असून सराईत गुन्हेगारावर लक्ष ठेवण्याचे कामही या पथकामार्फत केले जाणार आहे.
तसेच बेकायदेशीरपणे अवैध मद्यविक्री करणारे हॉटेल, ढाबे, दारुचे गुत्ते, अवैध ताडी विक्री, निर्मिती, हातभटटी दारु विक्री,निर्मिती आदी ठिकाणावर महाराष्ट्र दारुबंदी कायदयाच्या विविध कलमान्वये प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश सर्व क्षेत्रीय कार्यालये, भरारी पथके तसेच तयार करण्यात आलेल्या विशेष पथकास देण्यात आले आहेत.
आपल्या परिसरात अवैध मद्याची विक्री, निर्मिती तसेच वाहतुक होत असल्यास तात्काळ त्याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास देण्याचे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.