घाटशिळ पारगाव, आढळा, भंडारदरा व मांडआहोळ प्रकल्पातून शेतपिकांसाठी पाणी पुरवठा इच्छुक शेतकऱ्यांनी 15 डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर, 09 डिसेंबर – पाटबंधारे विभाग, अहमदनगर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प, आढळा मध्यम प्रकल्प, भंडारदरा प्रकल्प तसेच मांडआहोळ मध्यम प्रकल्पांतर्गत चालू वर्षी सन 2022-23 मधील उपलब्ध उपयुक्त पाणी साठयातुन पिण्यासाठी पुरेल इतका पाणीसाठा आरक्षित करुन जो पाणीसाठा शिल्लक राहत आहे, त्या शिल्लक राहत असलेल्या पाण्यामध्ये विविध पिकांसाठी पाण्याचा पुरवठा अटी व शर्तींच्या अधिन राहून करण्यात येणार आहे. इच्छुक लाभधारकांनी पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात 15 डिसेंबर,2022 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प, मांडआहोळ मध्यम प्रकल्प, आढळा प्रकल्पातील रब्बी हंगाम सन 2022-2023 मध्ये उभा उस, फळबाग, अन्नधान्य व चारा पिके, गहु, हरभरा तसेच इतर रब्बी हंगामी भुसार उभ्या पिकासाठी एक पाणी तर भंडारदरा प्रकल्पातील पिकांसाठी दोन पाणी देण्याचे नियोजित आहे. न.नं.7 व 7 अ करीता मर्यादित पाणी साठयामुळे खातेदारास मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता न आल्यास व त्यामुळे त्यांचे पिकाचे काही नुकसान झाल्यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही. आलेल्या मागणीस शिल्लक राहत असलेल्या पाण्याचे मर्यादेपर्यंत पूर्णतः अगर अंशत: मंजूरी देण्याचा अधिकार जलसंपदा विभागाकडे राखून ठेवलेला आहे. पाणी पुरवठ्याबाबतच्या अटी व शर्ती संबधित विभागामध्ये पहाण्यासाठी उपलब्ध असून इच्छुक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा लाभ घेऊन अधिक प्रमाणात उत्पन्न घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.