म्हैसगांव येथे रात्री मुक्कामी थांबलेल्या एसटी बसमधील सुमारे ११ हजार रूपये किंमतीचे डिझेल चोरीस!राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल!

राहुरी दि.५ डिसेंबर (प्रतिनिधी)
राहुरी तालूक्यातील म्हैसगांव येथे रात्री मुक्कामी थांबलेल्या एसटी बसमधील सुमारे ११ हजार रूपये किंमतीचे डिझेल अज्ञात भामट्याने चोरून नेले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र अनंदा पाटील,( वय ४१ वर्षे), हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आगार येथे एसटी बसवर चालक म्हणून कार्यरत आहेत. कल्याण येथुन दुपारी १२.३० वा. निघणारी बस राहुरी तालूक्यातील म्हैसगाव येथे मुक्कामी असते. दि. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वा. चालक राजेंद्र पाटील व वाहक एम. के. देशमुख हे एस टी बस ( एम. एच. १४ बिटी १३९६) ही एसटी बस कल्याण येथुन निघून सायंकाळी ७ वा. राहुरी तालूक्यातील म्हैसगांव येथे पोहचली. तेथे गेल्यानंतर चालक राजेंद्र पाटील यांनी एसटी बस केदारेश्वर मंदिराचे बाजुला लावली. जेवण केल्यानंतर चालक व वाहक बसमध्ये झोपले.
त्यावेळी मध्यरात्रीच्या दरम्यान एसटी बसच्या डिझेल टाकीमधून कोणीतरी अज्ञात भामट्याने ११ हजार १६० रूपये किंमतीचे १२० लिटर डिझेल चोरुन नेले. सकाळी उठल्यानंतर डिझेल चोरी गेल्याचे चालक राजेंद्र पाटील यांच्या लक्षात आले. चालक राजेंद्र आनंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा (रजि. नं. १२३३/२०२२ )भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.