रस्त्याचे काम सुरू न झाल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार जन आधार संघटनेचा इशारा : उक्कडगाव- मांडवादरम्यान डांबरीकरण रखडले!

अहमदनगर दि.४ डिसेंबर (प्रतिनिधी) : नगर तालुक्यातील उक्कडगाव- मांडवा या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे. येत्या १५ दिवसांत हे काम सुरू न झाल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशारा जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अधीक्षक अभियंता ग.भि. पाटील यांना शुक्रवारी पोटे यांनी निवेदन दिले.
उक्कडगाव- मांडवा या अडीच कोटी रुपये खर्चाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे; परंतु, वर्षभरात पूर्ण खडीकरणही झालेले नाही. काही ठिकाणी खडीचे ढिगारे तसेच आहेत. झालेले खडीकरण उखडले असून डांबरीकरण अद्याप बाकी आहे. हे काम पावसाळ्यात बंद होते. आता पाऊस उघडून दीड महिना झाला तरी रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू केलेले नाही. संबंधित ठेकेदाराची प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केली तरी प्रशासन दखल घेत नाही. अशा मुजोर ठेकेदारामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनदेखील सर्वसामान्य प्रवाशांच्या दळणवळणात अडचणी येत आहेत. त्यामुळे हे काम येत्या १५ दिवसांत सुरू झाले नाही तर बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असे पोटे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे विजय मिसाळ, अमित गांधी, दीपक गुगळे, शाहनवाज शेख, गौतमी भिंगारदिवे आदी उपस्थित होते.