मार्जिन मनी योजनेचा नवउद्योजक मागासवर्गीय तरूणांनी लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे समाज कल्याण विभागात युवा गटाची कार्यशाळा संपन्न

अदमदनगर, २ डिसेंबर ‘‘अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक तरूणांसाठी शासनाच्या वतीने ‘मार्जिन मनी योजना’ राबविली जाते. या योजनेतील सबसिडीचा लाभ नवउद्योजक तरूणांनी घ्यावा.’’ असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्यात संविधान दिन- २६ नोव्हेंबर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर या कालावधीत ‘समता पर्वाचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये ‘युवा गटा’ची कार्यशाळा घेण्यात आली. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘युवा गटा’तील तरूणांना मार्गदर्शन करतांना श्री. देवढे बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक बालाजी बिराजदार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे तात्यासाहेब जीवडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) चे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद आणि उद्योजक जितेंद्र तोरणे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
श्री.देवढे म्हणाले, ‘‘मागासवर्गीय तरूणांमधील उद्योग कौशल्य वाढावे, त्यांना शासकीय पातळीवर मदत व्हावी. यासाठी योजना राबविल्या जातात. ‘स्टँण्ड अप इंडिया’ योजनेत नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर बँकेकडून ७५ टक्के कर्ज मंजूर होते. उर्वरित फ्रंट एंड सबसिडी स्वरूपात नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.’’
‘‘जिल्ह्यात युवागटांच्या माध्यमातून मागासवर्गीय तरूणांना प्रशिक्षण व रोजगारांवर भर देण्यात येत आहेत. जिल्ह्यात १२५ युवागटांची स्थापना करण्यात आली आहे. या युवागटांशी १४३९ तरूण जोडले गेले आहेत.’’ अशी माहितीही श्री.देवढे यांनी यावेळी दिली.
स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर योजनेबाबत ही यावेळी श्री.देवढे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री रोजगार विकास कार्यक्रमाबाबत श्री.बिराजदार यांनी सविस्तर माहिती दिली. यशस्वी उद्योजक होण्यासाठी किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी तरूणांमध्ये कोणते गुण कौशल्य आवश्यक आहेत. याबाबत उद्योजक श्री. तोरणे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा शंभर ते दीडशे युवकांनी लाभ घेतला. कार्यशाळेचे संयोजन समाजकल्याण कर्मचाऱ्यांनी केले.