देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : गेली सहा दशक महाराष्ट्रात आणि चार दशकं अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेचा झंझावात सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कांसाठी घोंगावतो आहे. शहरातील सर्व घटकांच्या हिताच्या संरक्षणा करिता आणि विकासा करिता शिवसेनेने, शिवसैनिकांनी, लोकांच्या भरघोस पाठिंबावर तीव्र लढा उभारला. काळ पुढे सरकत राहिला. मात्र शिवसेनेचा समाजसेवेचा विचार आजही आढळपणे काम करतो आहे. शहराची नियोजन शून्य वाटचाल, त्यातून झालेली वाताहात, मनपाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड, याला लगाम घालत शहर वाचवायच असेल तर आगामी मनपा निवडणुकीत महायुतीचा पराभव नगरकरांच्या पाठिंब्याने ठाकरे शिवसेनेला करावाच लागेल, असे प्रतिपादन शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
पक्षाच्या स्थापनेला आज ५९ वर्षे पूर्ण झाली. वर्धापन दिना निमित्त ठाकरे शहर शिवसेनेच्या वतीने अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग, अंध बांधवांना फळ, खाऊ वाटप करून स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार आघाडीचे नेते विलास उबाळे, शहर कामगार सेना प्रमुख गौरव ढोणे, युवा सेना अहिल्यानगर विधानसभा युवा अधिकारी आनंद राठोड, सुनील भोसले, व्यापारी आघाडीचे महावीर मुथा, ओबीसी आघाडीचे गणेश आपरे, किशोर कोतकर, सामाजिक न्याय विभागाचे विकास भिंगारदिवे, बबन आढाव, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, मागासवर्गीय विभागाचे रोहिदास भालेराव, देवराम शिंदे, दीपक काकडे, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६० मध्ये सर्वप्रथम मार्मिकची स्थापना केली. सामान्य मराठी माणसाची तगमग आणि बाळासाहेबांची तळमळ यातून १९ जून १९६६ ला शिवसेनेचा जन्म झाला. तेव्हापासून गेली अनेक दशकं या महाराष्ट्रात ठाकरी बाणा गरजतोय. १९९५ मध्ये मराठी माणसाच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच शिवशाही सरकार आलं. शिवसेना सामान्य माणसाचा आधार बनली.
काळे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेने कायम संघर्ष केलाच. पण अहिल्यानगर शहरात देखील शिवसेना कायम संघर्षाच्याच भूमिकेत राहिली. हा संघर्ष सर्वसामान्य माणसासाठी, या शहराला दहशतमुक्त करण्यासाठी, शहराच्या प्रगतीसाठी, गोरगरीब, दीन दुबळ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, व्यापारी, उद्योजकांना पाठबळ देण्यासाठीचा संघर्ष शिवसेनेने या शहरात स्व. अनिलभैय्या यांच्या नेतृत्वाखाली केला. स्व. राठोड यांची उणीव आज ही निश्चितच आहे. ती केवळ शिवसैनिकांनाच नव्हे तर तमाम नगरकरांच्या मनामध्ये आहे. पण शिवसेना कधी रडगाणं गात नाही. त्यामुळे ही उणीव भरून काढायची असेल तर त्यांनी घालून दिलेल्या प्रामाणिकपणान राजकारण, समाजकारण करण्याच्या विचारावर चालत राहून काढावी लागेल. नगरकरांसाठी आजही शिवसेना तितक्याच ठामपणे उभी आहे, हा विश्वास या शहरातील जनतेच्या मनात आहे आणि तो जपण्याचं काम आम्ही शिवसैनिक सातत्याने करत राहू, असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला.
शहराचे तीन तेरा, नऊ बारा वाजलेत :
सरकार निवडणुकांना घाबरतय. म्हणून निवडणुका त्यांनी अनेक वर्ष टाळल्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यामुळे त्या होऊ घातल्यात. मात्र प्रशासक राजच्या माध्यमातून शहरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीतील घटक पक्षांनी संपूर्ण शहराचे तीन तेरा, नऊ बरा वाजवले आहेत. शहरातील विकास कामांचे कोणतेही नियोजन नाही. ऐन पावसाळ्यात संपूर्ण शहर खोदून ठेवले आहे. या शहरातील व्यापारी, उद्योजक, चाकरमानी, हातावर पोट भरणारा, प्रत्येक घटक यामुळे बेजार झाला आहे. नियोजन शून्य कारभार करणाऱ्या आणि भ्रष्टाचार करून शहराची लाईफ लाईन असणाऱ्या महानगरपालिकेला महायुतीने गिळंकृत केले आहे. नगरकरांच्या पाठिंब्याने शहर वाचविण्यासाठी आगामी मनपा निवडणुकी करिता ठाकरे शिवसेना सज्ज असल्याचे, यावेळी किरण काळे म्हणाले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा