नगर तालुक्यातील दुर्दैवी घटना! शेतीपंपाची वीज तोडल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या:नातेवाईकांचा आरोप!

अहमदनगर दि.२८ (प्रतिनिधी )
शेतीपंपाची वीज तोडल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप
नगर तालुक्यातील अकोळनेर येथील शेतकरी पोपट आबाजी जाधव (वय ५३) यांनी मेहेत्रे मळा परिसरातील शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.२८) सकाळी घडली. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज तोडल्यामुळे पिकाला पाणी देता न आल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
शेतकरी पोपट जाधव यांच्या पश्चात पत्नी व २ मुले आहेत. जाधव यांनी मेहेत्रे मळा परिसरातील शेतातील झाडाला गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक जयवंत जाधव व इतरांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यावेळी रुग्णालय परिसरात त्यांच्या नातेवाईक आणि अकोळनेर ग्रामस्थांचा मोठा जमाव जमा झाला. महावितरण कंपनीच्या त्रासाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला.या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेत जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
मयत पोपट जाधव यांची शेती असून त्यांनी गहू आणि हरबरा पेरणी केली असल्यामुळे पेरणी नंतर गव्हाच्या पिकाला पाण्याची मोठी गरज असते, मात्र महावितरण कंपनीने गेल्या आठ दिवसापासून वीज खंडीत केल्याने पोपट जाधव रोज शेतीमध्ये जाऊन वीजपुरवठा सुरळीत झाला का नाही याची पाहणी करून पुन्हा येत होते. वीज खंडित केली गेल्यामुळे पाणी असूनही गव्हाच्या पिकाला पाणी देऊ शकत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी अखेर सोमवारी (दि.२८)पहाटेच्या दरम्यान शेता जवळील एका झाडाला गळा फास घेऊन आत्महत्या केली आहे असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.
या घटनेनंतर नगर तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून जोपर्यंत वीज मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पोलीस गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. पोलिसांनी सुमोटो करून स्वतः वीज वितरण मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत दोषी असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.