पिंपळगावला शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न दारु विक्रेत्या गुंडा विरोधात रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन न्यायप्रविष्ट जागेची खरेदी घेऊन, ताब्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- न्यायप्रविष्ट शेत जमीनीचा ताबा घेण्यासाठी खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार्या पिंपळगाव उज्जैनी (ता. नगर) येथील गुंड प्रवृत्तीच्या दारु विक्रेत्याकडून तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना धोका असल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना चुकीच्या पध्दतीने जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणार्या गाव गुंडावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रिपाईचे नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, शहराध्यक्ष किरण दाभाडे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्ष आरती बडेकर, बौद्धाचार्य संजय कांबळे, तक्रारदार अमोल आल्हाट, शितल आल्हाट, अनिता आल्हाट, मालन आल्हाट, इंदुबाई आल्लाट, छायाबाई आल्हाट आदींसह आल्हाट कुटुंबीय उपस्थित होते.
अमोल अल्हाट रिपाईचे नगर तालुका उपाध्यक्ष असून, त्यांचे पोखर्डी (ता. नगर) पिंपळगाव उज्जैनी रोड, कराळे वस्ती येथे गट नंबर 79 व गट नंबर 104 ही जागा आहे. या जागेचा वाद न्यायालयात सुरु आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हरकत घेऊन देखील या जागेचे खरेदी खत गुंड प्रवृत्तीच्या दारु विक्रेत्याने घेतले. या सर्व जमीनीवर तक्रारदार अल्हाट यांचा ताबा असून, त्यांचे कुटुंबीय राहत आहे.
न्यायप्रविष्ट जागेची खरेदी घेऊन सदरील गाव गुंडाने ताबा घेण्यासाठी आदिवासी समाजाच्या व्यक्तींना शेतात घुसवले आहे. या आदिवासी व्यक्तींना फुस लावून अमोल अल्हाट व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहे. सदरील आदिवासी व्यक्तींशी तक्रारदाराचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसताना, त्यांना गुन्ह्यात अडकवून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. सदरील गाव गुंडावर अनेक गुन्हे दाखल असून, एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून या प्रकरणाची दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणी गैरमार्गाने ताबा घेणार्या गाव गुंडावर कारवाई करण्याची मागणी रिपाईने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.