विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार – समिती अध्यक्ष विकास पानसरे

अहमदनगर, १६ नोव्हेंबर (प्रतिनिधी) – ११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऐनवेळी विद्यार्थ्याची होणारी धावपळ वाचणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी आज येथे दिली.
‘मंडणगड पॅटर्न’ च्या धर्तीवर महाविद्यालयातच”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” देण्याचा उपक्रमास अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित काम पाहणारे कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन वेबीनार’ आज घेण्यात आला. यावेळी ऑनलाईन मार्गदर्शन करतांना श्री.पानसरे बोलत होते. अहमदनगर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातून सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख आणि सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे सहभागी झाले होते. जिल्ह्यातील सुमारे २०० महाविद्यालयांचे प्राचार्य, कर्मचारी व प्रतिनिधींनी या ‘ऑनलाईन वेबनार’मध्ये सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
श्री.पानसरे म्हणाले, राज्याचे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ नुसार महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत.या नुसार अहमदनगर जिल्ह्यात काम करण्यात येणार आहे.
जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम ‘महसूल विभाग’ करत असते. आणि त्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे काम जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या करतात. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे ‘जात प्रमाणपत्र’ उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांच्या जातीची पडताळणी करणे जिकिरीचे होते. आता समाज कल्याण विभागाच्या या समित्या प्रांतधिकारी यांच्याशी संपर्क साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. असेही श्री.पानसरे यांनी याप्रसंगी सांगितले.
श्रीमती शेख म्हणाल्या, विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र”मिळवून देण्यासाठी पुढील महिन्यापासून जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून ‘समतादूतां’ची नेमणूक करण्यात आली आहे.
‘जात प्रमाणपत्र’ व ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करावा व त्यासाठी कोणते दस्ताऐवज जोडावेत, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत संशोधन अधिकारी भागवत खरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.