बारा तासाच्या आत 142 विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप ! जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा उपक्रम

अहमदनगर, १० नोव्हेंबर (प्रतिनिधी)– अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने त्रुटी पूर्तते अभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘विशेष मोहीम’ राबविण्यात आली. या मोहीमेत बारा तासाच्या आत 142 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वाटप करण्यात आले.
शैक्षणिक प्रकरणांच्या त्रुटी पूर्ततेसाठी ही मोहीम राबविण्यात आली. सध्या सीईटी-नीट परीक्षेच्या प्रवेश फेऱ्या चालू आहेत. त्यासाठी विद्यार्थी व पालकांची शैक्षणिक कागदपत्र जमवाजमव करण्याची धावपळ सुरू आहे. या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे , सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे यांची तीन सदस्य समितीने मेहनत घेत एका दिवसातच 142 विद्यार्थ्यांच्या प्रकरणांची तपासणी करून ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले आहेत.
विद्यार्थ्यांना सीईटी-नीट परीक्षेच्या प्रवेश फेरी साठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची ९ नोव्हेंबर शेवटची मुदत होती. या मुदतीत विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी समितीच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.