मेघशाम डांगे व रऊफ शेख यांची कामगिरी प्रेरणादायी : पोलिस अधीक्षक राकेश ओला ‘स्नेहबंध’च्या वतीने राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा पोलिस दलासाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. उपअधीक्षक मेघश्याम डांगे व पोलिस उपनिरीक्षक रऊफ शेख यांची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केले.
पोलिस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या प्रभारी पोलिस उपअधीक्षक (गृह) मेघशाम दा. डांगे व पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक रऊफ समद शेख यांचा स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी पोलिस अधीक्षक ओला बोलत होते. हा सत्कार पोलिस अधीक्षक कार्यालय येथे क्राइम मीटिंगमध्ये करण्यात आला. याप्रसंगी
श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, शिल्पकार बालाजी वल्लाल उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक ओला म्हणाले,
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध कामगिरी, गुणवत्तापूर्ण सेवा, उत्कृष्टसेवा यांसाठी राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात येते. नगर पोलिस दलातील डांगे व शेख यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर नगर पोलिस दलाचे नाव उंचावले आहे, हा पुरस्कार मिळवून त्यांनी जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या दोघांचा मला पोलिस दलाचा कुटुंब प्रमुख या नात्याने अभिमान वाटतो.
‘स्नेहबंध’चे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले, नगरचे पोलिस दल नेहमीच आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही अग्रेसर राहिले आहे. राष्ट्रपती पदकाने सन्मानित डांगे व शेख या दोन्ही अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.