ग्रंथालय चळवळ वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक- साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे

अहमदनगर, दि. 15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) – समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालयांची महत्वाची भुमिका आहे. यासाठी जिल्ह्यात ग्रंथालयांची संख्या वाढवून ग्रंथालय चळवळ वाढविली पाहिजे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. पठारे बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य संजय कळमकर, अशासकीय सदस्य किशोर मरकड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडुस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. पठारे पुढे म्हणाले, कथा-कादंबरी या साहित्यापलीकडे विज्ञान हे सुध्दा एक साहित्य आहे. या साहित्यात आपण खुप प्रगती करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने विज्ञान साहित्याचेसुध्दा वाचन करणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही हिदुस्थानातील समृध्द भाषा आहे. जगातल्या सर्व भाषांचा विचार केला तर मराठी भाषा सुध्दा खुप मोठी भाष आहे. जवळपास 13 कोटी लोक ही भाषा बोलतात, असे ते म्हणाले. मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे, असे अनेकवेळा आपण म्हणतो. परंतु आपली मुले इंग्रजी शाळेत जातात. या गोष्टींचासुध्दा आपण विचार केला पाहिजे. भाषेसंदर्भात आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. मराठी भाषा बोलतांना जवळपास 70 टक्के शब्द पारसी भाषेतील वापरले जातात. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेसाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांचे मराठी साहित्य समाजाला आजसुध्दा प्रेरणा देत आहे. असे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, आपण भौतिक प्रगती खुप केली आहे. याचबरोबर मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजे. मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी व ज्ञानाची वृध्दी करायाची असेल तर पुस्तक वाचन आवश्यक आहे. शासकीय कामकाज करतांना साहित्य वाचले जात नाही. त्यासाठी शासकीय अधिकारी-कर्मचा-यांनी वेळातवेळत काढुन वाचन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक श्री. कळमकर म्हणाले, मराठी भाषा लवचिक व सुंदर भाषा आहे. या भाषेच्या संवर्धनासाठी शासन स्तरावर सुध्दा प्रयत्न होत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता वाचनालय दिसू लागले आहे. शिक्षकांनी स्वतः वाचन वाढविले तर त्याच्या ज्ञानाचा फायदा ते विद्यार्थ्यांना देऊ शकतील. मराठी भाषा ही उपजिवीकेसाठीची भाषा झाली तर तिचे ख-या अर्थाने संवर्धन होईल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये “मला आवडलेले पुस्तक परिक्षण” आणि “मराठी भाषां संवर्धन” या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य किशोर मरकड यांनी केले तर सुत्रसंचालन मराठी भाषा समितीचे सदस्य शशिकांत नजान यांनी केले.
*जिल्हा कोषागार कार्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*
तत्पुर्वी सकाळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मान्यवरांनी वाचन प्रेरणा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, धर्मदाय कार्यालयाचे उपायुक्त श्री. सातव, अप्पर कोषागार अधिकारी श्री. येळीकर आणि कर्मचारी उपस्थित होते.