शिक्षक बँक निवडणुकीत तांबे गट आणि सदिच्छा महाआघाडीत सत्तेसाठी चुरस वाढली अंतर्गत बंडाळी व चारित्र्यहीन उमेदवारांमुळे गुरुकुल स्पर्धेबाहेर,तर रोहोकलेंचाही करिष्मा चालेना

(अहमदनगर संपादकीय महेश भोसले)
जिल्ह्यात गुरुजींच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शिक्षक बँकेची रणधुमाळी सुरु आहे.अतिवृष्टीमुळे स्थगित झालेली निवडणूक उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थगिती उठून येत्या रविवारी म्हणजे 16
ऑक्टोबरला मतदान होत आहे. बँकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चार पॅनल तयार झाले असून त्यामुळे चुरस आणखीनच वाढलेली आहे.
सध्या सत्ताधारी असलेल्या तांबे गटाने ऐक्य मंडळाशी जुळवून घेत बँकेत युती केली आहे.सत्ताधारी असूनही त्यांना जिल्ह्यातील सभासदांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. रोहोंकलेंची गुरुमाऊली तसेच गुरुकुल मंडळातून मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे इनकमिंग सुरु आहे. परंतु या इनकमिंगवरही सभासदांकडून विकले गेल्याचे आरोप होत आहेत.घड्याळ घोटाळा,कोरोना काळात लाटलेला प्रवास भत्ता यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीका होत असली तरी कर्जाचा कमी केलेला व्याजदर,सभासदांना मिळालेला डिव्हिडंड या गटाच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळेच हे मंडळ विजयाच्या स्पर्धेत आले आहे.परंतु एकल बांधवांनी घूमजाव करत आपला पाठिंबा सदिच्छा आघाडीला दिल्याने तांबे गटाला मोठा फटका बसणार आहे.
दुसरीकडे बँकेच्या इतिहासात सर्वात जुनं मंडळ असलेल्या सदिच्छा मंडळानेही बहुजन शिक्षक संघ,प्राथमिक शिक्षक संघ आणि साजिर मंडळ यांच्याशी युती करत रणांगणात उडी घेतली आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन या आघाडीने सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.बहुजनांना प्रथमच सत्तेत येण्याची संधी यानिमित्त मिळणार असल्याने जिल्हाभरातील बहुजन शिक्षक सदिच्छा महाआघाडीला सत्तेत आणण्यासाठी एकवटले असल्याचं चित्र आहे. विश्वासात न घेता एकलचा पाठिंबा असल्याचं जाहीर केल्याने एकल मंचही बापु तांबे यांच्यावर नाराज होऊन त्यांनीही सदिच्छा महाआघाडीला पाठिंबा दर्शवलाय.यामुळे एकल बांधव देखील या महाघाडीच्या पाठीशी एकवटल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे अपंग बांधवही सदिच्छा आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्याने राजेंद्र शिंदे यांनी राबवलेला *सोशल इंजिनिरिंगचा* प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. शेवटच्या आठवड्यात या आघाडीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता तांबे गट आणि सदिच्छा महाआघाडी यांच्यात विजयासाठी चुरस निर्माण झाल्याचं पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे गेल्या दोन पंचवार्षिक सत्तेपासून दूर असलेल्या गुरुकुलला सत्तेत आणण्याच्या इराद्याने संजय कळमकर स्वतः नवख्या स्वराज्यला घेऊन मैदानात उतरले आहेत. सुरवातीला हि आघाडी कागदावर बलाढ्य दिसत होती परंतु तिकीट वाटपावरून झालेली नाराजी या मंडळाला दूर करता आली नाही,यामुळे या मंडळातून आऊटगोईंग सुरूच असून गुरुकुलच्या कित्येक पदाधिकारी व नेत्यांनी गुरुकुलला सोडचिठ्ठी देऊन इतर मंडळात प्रवेश केला असल्याने गुरुकुलची ताकद क्षीण दिसत आहे.तर त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या स्वराज्यची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही.स्वराज्यच्या उमेदवारावरच महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने सभासद या मंडळास नापसंती दर्शवत आहेत,तर दुसरीकडे या मंडळाच्या जिल्हाध्यक्षानेच बापू तांबेंच्या गुरुमाऊलीला पाठिंबा दिल्याने व आपणच स्वराज्य मंडळाचा जिल्हाध्यक्ष असल्याचा दावा केल्याने या मंडळात उभी फूट पडली आहे.एकूणच गुरुकुल मंडळाचा याआधीचा कारभार पाहता सभासद पुन्हा गुरुकुल मंडळाला सत्ता देईल असे वाटत नाही यामुळे हे मंडळ सत्तेच्या स्पर्धेतून बाहेर झाल्यात जमा आहे.
स्वच्छ आणि प्रामाणिक अशी प्रतिमा घेऊन उतरलेल्या व गेल्या पंचवार्षिकला एकहाती सत्ता मिळवलेल्या रोहोकले गुरुजींचीही यंदा चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.नेत्यांना व विद्यमान संचालकांना दिलेली तिकिटे यामुळे सामान्य गुरुमाऊली प्रेमी गुरुजींवर नाराज आहे.त्यामुळे बऱ्याच नेत्यांनी घरात बसून घेणं पसंद केलं आहे.यामुळे हि निवडणूक रोहोकले गुरुजींसाठी प्रतिष्ठेची व दमछाक करणारी असणार आहे.शेवटच्या दिवसात गुरुजी काहीतरी करिष्मा दाखवतील या आशेवर अजूनही गुरुमाऊली प्रेमी होते परंतु तीही अपेक्षा फोल ठरल्याने बऱ्याच उमेदवारांनी प्रचारातून माघार घेतल्याचं चित्र दिसत आहे.
एकंदर सर्व निवडणुकांपेक्षा असलेली हि निवडणूक सर्वांसाठी प्रतिष्टेची असली तरी सध्या तरी बापू तांबे गट आणि सदिच्छा महाआघाडी या स्पर्धेत वरचढ असल्याचेच दिसत आहे.