सामाजिक न्याय विभाग वंचित घटकांसाठी तत्परतेने काम करणारा विभाग: संभाजी लांगोरे सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापनदिन साजरा

अहमदनगर, दि. 14 ऑक्टोबर (प्रतिनिधी) – शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी तत्परतेने काम करणारा सर्वात जुना विभाग आहे. या विभागाप्रमाणेच समाजातील इतर घटकांनी सुध्दा गोरगरीबांसाठी असलेल्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या 90 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील समाजकार्य महाविद्यालयात (सीएसआरडी) आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले, प्रादेशिक उपायुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अमीना शेख, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुरेश मुगुटमल, सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर, ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब सोनावणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. लांगोरे पुढे म्हणाले, समाजातील सर्व घटकांनी सामाजिक दृष्टिकोन ठेवून गोरगरीब व वंचित घटकांसाठी काम केले तर निश्चितच समाजाची प्रगती होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक न्याय विभाग नेहमी तत्परतेने कार्य करत असल्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत या विभागाच्या योजनांचा लाभ पोहोचत असतो. सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे सांगून उपस्थितांना वर्धापनदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यावेळी म्हणाल्या, सामाजिक न्याय विभाग हा समाजातील दुर्बल घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्याचे कार्य करतो. संतांच्या शिकवणीमधुन सुध्दा सामाजिक न्यायाची जाणीव समाजापर्यंत पोहोचली आहे. समाजामध्ये समानतेची वागणुक आवश्यक असल्याचे संतांनी सुध्दा सांगितले आहे. थोर पुरुषांचे विचार सुध्दा समाजाने अंगिकारले पाहिजे व त्या दृष्टीने कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले, प्राध्यापक डॉ. सुरेश मुगुटमल, सामाजिक कार्यकर्ते संजय खामकर, ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब सोनावणे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती करून देत विभागाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची माहिती दिली.
समाजकल्याण विभागाच्या ज्येष्ठ नागरीक, स्वाधार योजना, दिव्यांग युआयडी योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे कर्मचारी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सॅमिअल वाघमारे यांनी केले तर श्री. कातकाडे यांनी आभार व्यक्त केले.