राजकिय

आ. बाळासाहेब थोरातांना विरोधी पक्षनेते करण्याची राहुल गांधी, खर्गेंकडे मागणी करणार : किरण काळे ; सुजय विखेंनी काँग्रेसची चिंता करू नये, काळेंचा सल्ला

अहमदनगर दि. ४ जुलै (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. मात्र राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजप सोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला आहे. अशा बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने केलेला दावा योग्य असून माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर पक्षाने विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवावी अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे पत्र पाठवून करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

काळे म्हणाले की, यापूर्वीच्या अहमदनगर जिल्ह्यातील राज्याच्या माजी विरोधी पक्षनेत्यांनी भाजपची वाट धरली. आताच्या विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी देखील भाजपची वाट धरत थेट सत्तेत जाऊन बसले आहेत. राज्याला खऱ्या सक्षम विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याची गरज आहे. कुणी कुणा सोबत जावे, हा ज्या त्या पक्षाचा नेत्यांचा, आमदारांचा प्रश्न आहे. मात्र यामुळे सर्वसामान्य मतदारांचा राजकीय व्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे. असे असले तरी देशाला अधोगतीच्या मार्गावर नेत जातीय द्वेष पसरविणाऱ्या भाजप समवेत काँग्रेस कदापि ही जाणार नाही, असा काँग्रेस कार्यकर्त्यांसह जनतेला देखील पूर्ण विश्वास आहे.

बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ आहेत. पक्षाच्या पडत्या काळात आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी बाजीप्रभूंची भूमिका सक्षमपणे वठवलेली आहे. त्यामुळेच काँग्रेस संपली अशी आवई राज्यात उठवली जात असताना काँग्रेसला त्यांनी सत्तेत आणण्याचा करिष्मा करून दाखवलेला आहे. त्यांच्या पक्ष एकनिष्ठतेचा इतिहास अनेक दक्षकांचा, पिढ्यांचा आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पक्षाने त्यांच्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपवावी अशी कार्यकर्त्यांची भावना असून राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गेंना तसे पत्र पाठविणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी अब काँग्रेस की बारी है, असे म्हणत काँग्रेस फोडण्याबाबत वक्तव्य केले होते. याचा किरण काळे यांनी खरपूस समाचार घेतला असून विखेंनी याबाबत न बोललेलेच बरे. तुम्ही ज्या काँग्रेसच्या जीवावर मोठे झालात त्याच काँग्रेसमधून फुटून भाजपच्या दावणीला गेलात. काँग्रेस फोडण्याची स्वप्न पाहण्यापूर्वी आधी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत तुमच्याच उत्तरेतील पारंपारिक मतदारांनी तुमचा भ्रमाचा भोपळा फोडला आहे. त्याकडे आधी लक्ष द्यावे. मग काँग्रेस फोडण्याची भाषा करावी. काँग्रेसची चिंता करू नये, असा सल्ला काळेंनी विखे यांना दिला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे