एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप ठरत आहेत गुन्हेगारांचा कर्दनकाळ! एमआयडीसी पोलिसांनी 8 महिन्यात पकडले 174 गुन्हयातील 100 आरोपी

अहमदनगर दि. १० सप्टेंबर (प्रतिनिधी): यावर्षी १ जानेवारी पासून ऑगस्ट अखेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या १७४ गुन्ह्यातील १०० आरोपींना जेरबंद करून एकूण १ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. या कामगिरीची दखल घेत नाशिक परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार केला आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी आगामी सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगरमध्ये येवून जिल्ह्याचा गुन्हेगारी विषयक आणि पोलिसांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी पोलिस अधिकक्षक राकेश ओला यांनी यावर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस ठाण्यांचा अहवाल त्यांच्यापुढे सादर केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र सानप यांनी यावर्षी १ जानेवारी पासून ऑगस्ट अखेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या १७४ गुन्ह्यातील १०० आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी एमआयडीसी पोलिसांनी केली असल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच अटक आरोपींकडून एकूण १ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे महानिरीक्षक डॉ. शेखर यांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचा सत्कार करत एमआयडीसी पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी ,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.