देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 5 फेब्रुवारी: महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेच्या कामाची दखल आता थेट शेजारच्या गोवा सरकारनेही घेतली आहे. ‘अमृत’तर्फे दिले जाणारे ड्रोन प्रशिक्षण अत्यंत दर्जेदार असल्याने, गोवा सरकारने आपल्या ३० अधिकाऱ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले आहे. तसा अधिकृत प्रस्तावच गोवा सरकारने मंजूर केल्याची माहिती ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी दिली आहे.
‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) ही पुणे मुख्यालय असलेली एक स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ही संस्था काम करते. याचाच एक भाग म्हणून ‘अमृत ड्रोन मिशन’ चालवले जाते. विशेष म्हणजे, हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत असते. आतापर्यंत १०० हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला असून त्यांना चांगला रोजगारही मिळाला आहे.
सध्या शेती फवारणी, जमिनीची मोजणी, सरकारी पाहणी व व्हिडिओग्राफीसाठी ड्रोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रात कुशल लोकांची मोठी गरज आहे. ‘अमृत’ संस्थेचा यातील अनुभव आणि दर्जा पाहून, गोवा सरकारच्या नियोजन व सांख्यिकी विभागाने त्यांच्या ३० अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे संचालक विजय सक्सेना यांनी तसे पत्रच संस्थेला पाठवले आहे.
राज्यातील जास्तीत जास्त तरुणांनी अमृत संस्थेच्या या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले करियर घडवावे, असे आवाहन श्री. जोशी यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा