दसऱ्याला राजकीय सीमोल्लंघन करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश!शिवनेरीवरील पहिलाच प्रवेश!

अहमदनगर (प्रतिनिधी) : एकीकडे शिंदे सेना व ठाकरे सेनेचा दसरा मेळावा हा राज्यात उत्सुकतेचा विषय होता. नगर मधूनही दोन्ही गटांचे कार्यकर्ते मुंबईला गेले होते. दुसरीकडे शहरात पाईपलाईन रोडवरील रावण दहन कार्यक्रमाच्या निमित्ताने शहराचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. तर तिसरीकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात राजकीय सीमोल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत शहर विकासात अडथळा असलेल्या निष्क्रिय राजकीय प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन काळे यांनी केले.
काँग्रेसच्या चितळे रोड येथे नव्याने सुरू झालेल्या शिवनेरी कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वीच पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. आजवर भाजप, शिवसेना, मनसेसह अन्य पक्षांमधून काँग्रेसमध्ये यापूर्वी अनेक पक्षप्रवेश झाले होते. मात्र राष्ट्रवादी मधून काँग्रेसमध्ये झालेला हा पहिलाच प्रवेश आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा धक्का मानला जात आहे. घटस्थापनेला नागरिकांसाठी कार्यालय खुले केल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय सीमोल्लंघन करत काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे. प्रभाग क्रमांक ११ मधील गेल्या सुमारे दोन दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करणाऱ्या गणेश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
प्रवेशापूर्वी चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने बंगाल चौकी पासून चितळे रोड पर्यंत रॅली काढून घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. काळे यावेळी म्हणाले की, कोण नेते कोणत्या पक्षात आहेत, कोण कोणत्या पक्षात राहून इतर कोण-कोणत्या पक्षांशी संधान साधून आहे, कोण कोणाच्या दावणीला बांधले आहे, हे शहराच्या विकासासाठी महत्वाचे नाही. शहराला वाली न राहिल्यामुळे दुरावस्था झाली आहे. नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. मात्र नगरकरांनी सत्तेच्या चाव्या हाती दिल्यास व्हिजन असणारी काँग्रेस हीच शहराचा विकास करू शकते हा विश्वास मनात बाळगून अन्य पक्षातील नेत्यांना सोडून कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहेत. ही आगामी विकासाच्या मुद्द्यावरून लढल्या जाणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस व शहरासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.
गणेश चव्हाण हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. समाजातल्या विविध घटकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. सर्वसामान्यांचे दुःख कमी करण्यासाठी ते सतत रात्री-अपरात्री धावून जातात. तळागाळात काम करणारी अशी माणसं शहरात राजकीय, सामाजिक कार्यासाठी काँग्रेसचा पर्याय निवडत आहेत. ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या मागे काँग्रेस पक्षाची संपूर्ण ताकद उभी केली जाईल. ते आणि त्याच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना शतप्रतिशत सन्मानाची वागणूक दिली जाईल, असे यावेळी काळे म्हणाले.
चव्हाण यांनी पुढील काळात लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेसच्या माध्यमातून अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यावेळी म्हणाले की, यापूर्वी मी ही राष्ट्रवादीत काम केले. मात्र स्व. अनिलभैय्या राठोड यांच्यानंतर शहरासाठी तळमळ असणारे आणि विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व म्हणून काळेंच्या नेतृत्त्वाखाली मी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील काँग्रेसचा पर्याय निवडला आहे. त्यांचा निर्णय योग्य आहे. हे येणारा काळ त्यांना दाखवून देईल. यावेळी शिवनेरीवर आपट्याची पाने देत कार्यकर्त्यांनी विजयादशमीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चव्हाण यांच्यासह सुरजसिंग कुडिया, दिनेश पारधे, विजय सौदे, मुकेश कलोसिया, रोहन चव्हाण, शिवम साठे, रोहित बोरुडे, स्वप्निल साठे, रेहान खान, अरुण चोटीले जालिंदर वाघ, मुकदेव गावकर, चितळे सर, अनिल साठे साहिल चव्हाण, बाळासाहेब चांदणे, आयुब बाबा, आशिष रोहदिया, नंदकुमार पठारे, कैलास जाधव आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रवेश केला. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस शहराध्यक्ष प्रवीण गीते, प्रशांत जाधव, माजी नगरसेवक फैयाज शेख, शहर सरचिटणीस स्वप्निल पाठक, ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष अशोक शिंदे, युवक काँग्रेस सरचिटणीस आकाश आल्हाट, विनोद दिवटे, महेश काळे आदी उपस्थित होते.