वाईचा सचिन चव्हाण ठरला प्रथम कर्जत महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा मानकरी!
आ.रोहित पवार आयोजित भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीला संपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत प्रतिनिधी : दि २ जून

कर्जत प्रतिनिधी : दि २ जून
आ रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीत वाई (जि. सातारा) येथील सचिन चव्हाण ठरला प्रथम क्रमांकांचा मानकरी. या भव्य शर्यतीत महाराष्ट्राच्या विविध भागातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. गुरुवारी कर्जत शहरातील मैदानावर या भव्य राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या स्पर्धेत अनेक अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
महाराष्ट्राच्या विविध भागातील ५०० पेक्षा अधिक बैलजोडींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या मैदानास अनेक मान्यवरांनी भेट देत आ रोहित पवार यांचे विशेष कौतुक केले.
आ रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास प्रकल्प यांच्या माध्यमातून गुरुवार, दि २ जून रोजी कर्जत शहरात भव्य अशी “महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत”आयोजित केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून तब्बल ५०० पेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदविला होता. कर्जत शहरात यासाठी भव्य असे मैदान तयार करण्यात आले होते. यामध्ये एकूण २२ लाख रुपयांची बक्षिसे विजेत्या आणि सहभागी झालेल्या बैलगाड्यांना आ रोहित पवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यामध्ये संध्याकाळी उशिरा झालेल्या अंतिम शर्यतीत वाई जिल्हा सातारा येथील सचिन चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवत २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे पारितोषिक मिळवत “महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत कर्जतचा” मान मिळवला. यासह माळशिरसच्या तांबोळी यांच्या राणा ग्रुपने द्वितीय क्रमांक घेत १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह पटकावले तर तिसरा क्रमांक किशोर भिलारे यांनी घेत ७७ हजार ७७७ रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळवले. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या अंतिम स्पर्धेतील शर्यतीसाठी एकूण ७ पारितोषिके देण्यात आली. या शर्यतीचा२५ हजारांहून अधिक नागरिक आणि क्रीडाप्रेमींनी बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवत आनंद लुटला
यावेळी बोलताना आ रोहित पवार म्हणाले की, बैल सजविण्याचे साहित्य विकणाऱ्यापासून ते शर्यत आयोजित केलेल्या ठिकाणी छोटेखानी व्यवसाय करणारे व्यावसायिकांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फायदा अशा स्पर्धांमुळे होत असतो. गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल तसेच आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचे सांगितले.
या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील विद्यमान राज्यमंत्री अदिती तटकरे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील आमदार देखील उपस्थित होते. यामध्ये आ अशोक बापू पवार, आ अनिल पाटील, आ संग्राम जगताप, आ आशुतोष काळे, आ निलेश लंके, आ राजू नवघरे, भाजपाचे आ शिवेंद्रराजे भोसले, संजय मामा शिंदे, आ दिलीप काका बनकर, आ यशवंत माने, आ इंद्रनील नाईक, आ अतुल बेनके, आ ऋतुराज पाटील, आ झीशान सिद्दिकी, आ राहुल जगताप यांचा समावेश होता. या सर्वांनी ग्रामीण भागात आ रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचे कौतुक करीत त्यांना धन्यवाद दिले.