आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अनुदान व बीजभांडवल योजनेत कर्ज वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन

अहमदनगर, 14 जूलै (प्रतिनिधी) – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान व बीजभांडवल योजनेत कर्ज वितरणासाठी मातंग समाजातील व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एल. मांजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
महामंडळाला अहमदनगर जिल्ह्याकरिता २०२२-२३ साठी अनुदान योजना १०० व बीजभांडवल योजना २५ असे एकूण १२५ लाभार्थी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. मातंग समाजातील मांग, मातंग, मिनी मादिंग, दानखणी मांग, मादिंग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी , मांग गारोडी, मादगी , मादिगा १२ पोटजातीतील व्यक्तींना व्यवसाय करिता सहाय्य देण्यात येते.
अनुदान योजनेत ५० हजार रूपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या प्रकल्पासाठी कर्जप्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के किंवा १० हजार रूपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येते व उर्वरित कर्ज बँक देते.
बीजभांडवल योजनेत ५० हजार ते ७ लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या प्रकल्पातील कर्जप्रकरणात अर्जदाराचा सहभाग ५ टक्के व २० टक्के महामंडळाचे कर्ज यामध्ये १० हजार रूपये अनुदानासह ४ टक्के वार्षिक व्याजदराने व ७५ टक्के कर्ज बँकेच्या व्याज दरानुसार कर्जाची परतफेड बँकेत करावयाची असून महामंडळाचे कर्ज परतफेड महामंडळाकडे करावयाची आहे.
कर्ज प्रकरण अर्जासोबत अर्जदाराचा जातीचा दाखला, कुटुंबाचे उत्पन्न दाखला, २ फोटो, शाळेचा दाखला, रेशनकार्ड छायाप्रती, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पेन कार्ड छायाप्रत, जागेच्या उपलब्धतेचा पुरावा – ७/१२, भाडेकरार, मालकी हक्क पुरावा इत्यादी, व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायासंबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव दाखला , वाहन व्यवसाय असल्यास वाहन चालक परवाना व इतर आवश्यक बाबी, व्यवसाय संबंधित प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रे जोडायची आहेत. या कागदपत्रासह २ प्रती मध्ये अर्ज जिल्हा कार्यालय मार्केट यार्ड इमारत, दुसरा मजला, महात्मा फुले चौक, अहमदनगर येथे करावा. असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक श्री. मांजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.