जिल्ह्यातील सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले

अहमदनगर दि. 21 मे (प्रतिनीधी) आगामी पावसाळ्याच्या काळात नैसर्गिक आपत्ती पुर प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांबाबत आपापल्या विभागाचा अद्ययावत आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्यात. नैसर्गिक आपत्ती पुर प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते आज बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा कृषि अधिक्षक शिवाजी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी संदिप सांगळे आदी विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यावेळी म्हणाले, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी विभागात व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष तात्काळ स्थापन करावे. आपत्तीच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे. या पार्श्वभुमीवर अधिकारी कर्मचा-यांची ट्रेनिंग, मॉकड्रिल घ्याव्यात. तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुरेशी आरोग्य विषयक सेवासुविधा, औषधसाठा यांचे नियोजन करावे. पुलांचे ऑडीट करावे. गावागावांमधील नादुरुस्त शाळा व इमारतीमध्ये शाळेचे वर्ग भरु नये, याकडे लक्ष द्यावे. तसेच विद्युत विभागाने या काळात विशेष यंत्रणा उभारुन नागरीकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वच्छ पाण्याचे नियोजन ग्रामपंचायतींनी करावे. महसूल, पशुसंवर्धन, पोलीस विभाग, अग्निशमन यंत्रणा यांनी या काळात सतर्क रहावे. याबरोबरच 24 x 7 नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, नियंत्रण कक्षात संपर्क अधिका-यांच्या नेमणूका करणे, पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडु नये, नियंत्रण कक्षातील यंत्रणांचे भ्रमणध्वनी कार्यरत ठेवणे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत पाटबंधारे, महसूल, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम, जलसंधारण, शिक्षण, विद्युत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, पोलीस विभाग, अग्निशामक दल, होमगार्ड आदी विभागांचा आढावा घेतला.