गाळपाअभावी राहिलेल्या ऊसाच्या प्रश्नावर ‘युक्रांद’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कर्जत (प्रतिनिधी) : दि २० मे
गाळपाअभावी शेतात उभा असलेल्या ऊसाचा प्रश्न सध्या गंभीर झाला आहे. या प्रश्नावर युवक क्रांती दलाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यासह सदर निवेदनाची एक प्रत कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आली आहे.
सदर निवेदनात सर्व शिल्लक ऊसाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. ऊसाची नोंद आहे की नाही अशा अटी न घालता राहिलेल्या ऊसाला एकरी ६० हजार रुपये अनुदान द्यावे. तसेच शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी युवक क्रांती दलाने अतिरिक्त उसाच्या प्रश्नाबाबत राज्याचे साखर आयुक्त यांना शिल्लक ऊसाच्या प्रश्नावर निवेदन देऊन ऊसाचे योग्य नियोजन करावे अशी मागणी केली होती. कर्जत तालुक्यातही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. युक्रांदकडे कर्जत तालुक्यातील शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी राहिल्याची माहिती संकलित झाली आहे. गाळपाअभावी मोठ्या प्रमाणावर ऊस शेतातच उभा असल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे. ऊसाचे टिपरूही राहणार नाही असे म्हणत आता अनेक कारखाने बंद झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घातले नाही तर ऊस पट्टयातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी योग्य आदेश संबंधीत विभागाला द्यावेत अशी मागणी युवक क्रांती दलाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे. यावेळी युवक क्रांती दलाचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, कर्जत तालुकाध्यक्ष प्रा. किरण जगताप, सचिव दादा राऊत, संघटक सलीम आतार, राशीन शहराध्यक्ष विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.
**** कोरोनाच्या तत्कालीन भयानकतेमुळे काही शेतकऱ्यांच्या नोंदी राहून गेल्या. दरम्यान उसाचे टिपरु शिल्लक राहणार नाही अशा बातम्या आल्याने शेतकरी गाफील राहिले. जनतेचे प्रश्न सहजपणे मिटवणारे लोकप्रतिनिधीनी उसाचा प्रश्न गांभीर्याने घेवून मार्गी लावावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र आज तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपाअभावी शिल्लक राहिल्याचे ‘युक्रांद’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर येत आहे.
–
किरण जगताप
तालुकाध्यक्ष,
युवक क्रांती दल,
कर्जत