छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचे सोमवारी आखाडा पूजन, तारखेत बदल, आता शहराच्या स्थापना दिनी रंगणार अंतिम सामने – स्वागताध्यक्ष किरण काळे

अहमदनगर दि.२१ मे (प्रतिनिधी) : किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने पार पडणाऱ्या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेचे सोमवारी आखाडा पूजन करण्यात येणार आहे. तसेच काही कारणास्तव स्पर्धेच्या तारखेमध्ये किरकोळ बदल करण्यात आला असून २७ मे ते २९ मे दरम्यान पार पडणारी ही स्पर्धा आता २६ मे ते २८ मे दरम्यान पार पडणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.
काळे म्हणाले की, अहमदनगर शहराचा शनिवार २८ मे रोजी स्थापना दिन आहे. या विशेष दिवसाचे औचित्य साधून आता याच दिवशी दुपारी ४.३० वाजता वाडिया पार्कच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील येणाऱ्या नामांकित मल्लांच्या कुस्त्यांचे चित्तथरारक अंतिम सामने व भव्य बक्षीस वितरण समारंभ पार पडणार आहे. गुरुवार दि. २६ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून स्पर्धेच्या ठिकाणी राज्यभरातून आलेल्या मल्लांचे वजन गटानुसार वजन घेण्याची तांत्रिक प्रक्रिया पंचांच्या वतीने पार पडणार आहे.
अनेक वर्षांनंतर वाडीया पार्क स्टेडियमच्या भव्य मैदानामध्ये कुस्ती स्पर्धा पार पडणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची जोरदार तयारी किरण काळे युथ फाऊंडेशनच्या वतीने सुरू आहे. स्वागताध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी ११.०० वाजता पार पडणाऱ्या आखाडा पूजनासाठी नगर शहर व जिल्ह्यातील आजी-माजी कुस्तीगीर, किरण काळे युथ फाऊंडेशन, अहमदनगर जिल्हा तालीम संघ, क्रीडा संघटना प्रतिनिधी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आदींची उपस्थिती असणार असल्याची माहिती जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली आहे.
किरण काळे म्हणाले की,स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून मल्ल येणार असून पुरुष मल्लांच्या निवासाची व्यवस्था लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय याठिकाणी करण्यात आली आहे. त्याच बरोबर मुली व महिला मल्लांच्या निवासाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल आवारातील क्रीडा हॉस्टेलमध्ये असणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने स्पर्धेचे कामकाज पाहण्यासाठी येणाऱ्या पंचांची खाजगी ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी येणाऱ्या मल्लांच्या भोजनाची देखील व्यवस्था किरण फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. कुस्ती स्पर्धांमध्ये आखाडा पूजनाला विशेष महत्व असते. आखाडा पूजनासाठी जिल्ह्यातील सर्व कुस्तीमल्लांनी, वस्तादांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी केले आहे.
*संयोजन सल्लागार समितीच्या प्रमुखपदी पै.सुभाष लोंढे, सहप्रमुखपदी पै. हर्षवर्धन कोतकर यांची निवड :
*या भव्य स्पर्धेच्या संयोजन सल्लागार समितीच्या प्रमुखपदी ज्येष्ठ मल्ल नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांची तर सहप्रमुखपदी पै. हर्षवर्धन कोतकर यांची निवड करण्यात आली आहे. स्वागताध्यक्ष किरण काळे यांच्या मान्यतेने या निवडी करण्यात येत असल्याची घोषणा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस क्रीडा विभाग जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी केली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ कुस्तीपटू, किरण काळे युथ फाऊंडेशन, जिल्हा तालीम संघाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.