स्व. राजीव गांधींनी केलेले राष्ट्र उभारणीचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावे – किरण काळे ;
स्व.गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन

अहमदनगर दि.२२ मे (प्रतिनिधी) : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी देश उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्याच काळात भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. आजचा टेक्नॉलॉजीकली प्रगत भारत हा त्याचेच विस्तारित रूप आहे. स्व.राजीवजींचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावे, असे प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
स्व.गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, संपत लोखंडे, विनोद भिंगारदिवे, शामराव जाधव, शफिकभाई शेख, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे आदी उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, राजीव गांधींच्या काळात शहरांसह गावांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्यामुळे भारताची जगामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम झाले. राजीवजींचा आदर्श समोर ठेवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना संकट काळात रस्त्यावर उतरत समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. या उलट विरोधी पक्ष काम करत करताना दिसत नसून केवळ शो बाजी सुरू असल्याचे दिसत आहे.
काळे पुढे म्हणाले की, राज्यघटनेच्या माध्यमातून भारतातील सामाजिक क्रांती झाली. त्यात राजीवजी यांचा कालखंड हा महत्त्वपूर्ण राहिला आहे. ते आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय काँग्रेस पक्षाने सरकारच्या माध्यमातून घेतले. पंचायतराज कायदा करून त्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करत समाजातील प्रत्येक घटकाला नेतृत्व करायची संधी त्यांनी निर्माण करून दिली.