रयत सेवक जिल्हा बदलीचा निर्णय चुकीचा, दिलासा मिळावा सेवकांची मागणी

कर्जत (प्रतिनिधी) : दि २२ मे
रयत सेवकांच्याबाबतीत झालेला जिल्हा बदली निर्णय अत्यंत चुकीचा असून सदर निर्णय अध्यक्षांनी मागे घेत दिलासा द्यावा अशी मागणी कर्जत रयत सेवकांच्यावतीने मॅनेजिंग सदस्य राजेंद्र फाळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात संस्थेतील सेवकांच्या जिल्हा बदलीचा अन्यायकारक असून हा बदली निर्णय रद्द करण्यात यावा. जिल्हा बदल झाल्याने प्रत्येक सेवकांची गैरसोय होणार आहे. हा निर्णय म्हणजे सर्व सेवकांनी काही गुन्हा केल्यामुळे त्यांना तडीपार करण्यासारखा आहे अशी भावना सेवकांमधून उमटत आहे. बदली नियमावलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण यासारख्या महत्वाच्या नियमाचे पालन झाल्याचे कुठेही दिसून येत नाही. २७ एप्रिल रोजी बदली निर्णयासाठी मॅनेजिंग कौन्सिलची बैठक संपन्न झाली यात ५०% जास्त सदस्यांनी या निर्णयास विरोध केल्याचे समजते आहे. तरी सुद्धा वरील तुघलकी निर्णय सेवकांच्या माथी मारण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे आम्ही सर्व सेवक या निर्णयास विरोध दर्शवित असल्याचे म्हंटले आहे. तरी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यासह पदाधिकाऱ्यांनी सर्व सेवकांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने रयत सेवक उपस्थित होते.