मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रीया सुरू डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन

अहमदनगर, दि.१ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहूजन कल्याण विभाग यांच्यामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झालेले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://mahadbtrahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरता येणार आहे. असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाडिबीटी पोर्टलमार्फत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फि परिक्षा फि, व्यावसायिक पाठ्यक्रमास प्रवेश विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहूजन कल्याण विभाग यांच्या प्रतिवर्षीच्या अर्जाची संख्या लक्षात घेता सदरचे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचा निर्णय विभागांनी घेतलेला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज ८ ऑक्टोबर व नुतनीकरण अर्ज १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत भरता येतील.
वरिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज २० ऑक्टोबर व नुतनीकरण अर्ज १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत भरता येतील. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी नवीन अर्ज ७ नोव्हेंबर व नुतनीकरण अर्ज ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत भरता येतील.
जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी वेळापत्रकाप्रमाणे अर्ज भरून घ्यावेत. विहीत मुदतीत अर्ज न भरल्याने एखादा विद्यार्थी वंचित राहिल्यास त्या विद्यार्थ्याबरोबरच संबंधित महाविद्यालयदेखील जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. तसेच शासन निर्णय ०१ नोव्हेंबर, २००३ नुसार अर्जांची पडताळणी करावी व पात्र अर्ज जिल्हास्तरावर पाठविण्यात यावेत, असे आवाहन श्री. देवढे यांनी केले आहे.