निमगाव वाघात हनुमान जयंतीनिमित्त लाल मातीच्या आखाड्याचे पूजन
हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला जन्मसोहळा

अहमदनगर दि.१८ (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये विधिवत पूजा व आरती करण्यात आली. सार्वजनिक व्यायाम शाळेत लाल मातीच्या आखाड्याचे पूजन करुन बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शनिवारी (दि.16 एप्रिल) मंदिरातील हनुमानजीच्या मुर्तीस दुग्धाभिषेक घालून हनुमानजींची आरती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच गावातील सार्वजनिक व्यायाम शाळेत लाल मातीच्या आखाड्याचे नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायतच सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी नगर तालुका तालीम सेवा संघाचे उपाध्यक्ष संदीप डोंगरे, पै. वैभव आंबेकर, पै. नवनाथ गायकवाड, पै. रुपेश नाट, पै. अमोल शिंदे, कृष्णा डोंगरे, भागचंद जाधव, पिंटू जाधव, ज्ञानदेव कापसे, भानुदास जाधव, ठाकाराम फलके, दत्तू फलके, भाऊसाहेब केदार आदी उपस्थित होते.