ब्रेकिंग

नगरच्या क्रीडा संघटनांचे प्रश्न सोडविण्याची क्रीडा मंत्री केदारांकडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंची मागणी

केदारांची नगरला धावती भेट ; शहर काँग्रेस, क्रीडा संघटनांनी केले स्वागत

अहमदनगर दि.१८ (प्रतिनिधी) : काँग्रेसचे नेते, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडा मंत्री ना. सुनील केदार यांनी नगरला धावती भेट दिली. यावेळी नगरच्या विविध क्रीडा संघटनांचे प्रश्न सोडविण्याची मागणी ना. केदारांकडे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केली. यावेळी विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. केदार यांचे शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने किरण काळे यांनी स्वागत केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस क्रीडा विभागाचे जिल्हा सचिव मच्छिंद्र साळुंखे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील क्रीडा मंत्र्यांचे संघटनांच्यावतीने स्वागत केले.
मंत्री केदार हे शनिशिंगणापूरच्या खाजगी दौऱ्यावर आले होते. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळे यांच्या आग्रहावरुन त्यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर क्रीडा संघटना प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी धावती भेट दिली. यावेळी क्रीडा संघटनांचे संजय साठे, दिनेश भालेराव, सुनील जाधव, विजय म्हस्के, शैलेश गवळी, संजय धोपावकर, घनश्याम सानप, निर्मल थोरात, शंतनू पांडव, विनायक भुतकर, जिल्हा तालीम संघाचे पै.वैभव लांडगे, शुभांगी दळवी, स्केटिंगचे सतिश गायकवाड, क्रीडा काँग्रेसचे प्रसाद पाटोळे, सुरज गुंजाळ, आदित्य क्षीरसागर, अमित बडदे, कल्पना देशमुख, नारायण कराळे, आदिल सय्यद यांच्यासह क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, सुधीर चपळगावकर आदींसह क्रीडापटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किरण काळे यांनी क्रीडा संघटनांच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न ना. केदार यांच्या समोर मांडले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. या माध्यमातून क्रीडा संकुलाचे रुपडे बदलता येऊ शकते. हे करत असतानाच जास्तीत जास्त खेळांना याचा लाभ मिळायला हवा. नगर शहराने व जिल्ह्याने आजवर अनेक गुणवंत खेळाडू दिले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चमकणाऱ्या खेळाडूंची फौज उभी करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांनी नगरच्या क्रीडापटूंच्या पाठीशी उभे राहावे असे साकडे यावेळी काळे यांनी मंत्री केदार यांना घातले. नगर जिल्हा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. स्वतः ना.थोरात हे क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सतत आग्रही असतात असे यावेळी काळे म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री केदार म्हणाले की, माझ्या मागचा नगर दौऱ्यात मी लवकरच नगरला पुन्हा येऊन क्रीडा संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेईल असे सांगितले होते. किरण काळे त्यासाठी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा करीत आहेत. लवकरच मी नगर दौऱ्यावर खास या विषयासाठी येणार आहे. त्यावेळी संघटनांसह अधिकाऱ्यांना देखील एकत्र बसवू. नगरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी काळे यांनी केलेल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी राज्याचा क्रीडा मंत्री या नात्याने नगरला आवश्यक ती मदत करण्याचे काम मी करेल, असे आश्वासन यावेळी केदार यांनी दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे