काँग्रेसच्या नवनिर्वाचित आ.जयश्री जाधवांचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले अभिनंदन
उद्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांसह विजयोत्सव साजरा करणार

– अहमदनगर दि.१५ (प्रतिनिधी): कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या पारड्यात आनंदाचे वजन टाकणारा लागला आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आ.जयश्री जाधव यांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे निवडून आल्याबद्दल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने अभिनंदन केले आहे. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसचा दणदणीत विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की, या पोटनिवडणुकीने दाखवून दिले आहे की काँग्रेसचा विचार हा समतेचा आणि राज्याच्या विकासाचा विचार आहे. कोल्हापूरचा निकाल हा सबंध महाराष्ट्रासाठी संदेश देणारा निकाल आहे. काँग्रेसच्या या विजयामध्ये महाविकास आघाडीचा वाटा देखिल महत्त्वाचा आहे. जयश्री जाधव यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण.
काळे पुढे म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी या निवडणुकीसाठी नेतृत्व केले होते. महाविकास आघाडीचे नेते देखील मैदानात उतरले होते. हा निकाल म्हणजे जातीयवादीशक्तींना मोठी चपराक आहे. नगर शहरासह जिल्ह्यात आगामी काळात काँग्रेस अधिक मजबूत झालेली निश्चित पाहायला मिळेल असा आशावाद काळे यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे.
काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये या निकालामुळे आनंदाचे वातावरण आहे. उद्या संध्याकाळी काँग्रेसच्या कालिका प्राईड येथील कार्यालयामध्ये किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते हा विजयोत्सव साजरा करणार असल्याची माहिती शहर काँग्रेसचे जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे यांनी दिली आहे.