
श्रीगोंदा दि.३१ (प्रतिनिधी) नगर- दौंड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बहीण भाऊ जागीच ठार झाल्याची घटना घडल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की शाळेत निघालेल्या सख्ख्या बहीण-भावास समोरून येणाऱ्या पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना नगर-दौंड राष्ट्रीय महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक सोनवडी शिवारात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (वय १४, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत.
आज सकाळी अनुष्का आणि आदित्य दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निघाले. निमगाव खलु येथून दौंडकडे जात असताना जुन्या टोल नाक्याजवळ टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात दौंडकडून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव पिकअपने दोघांना समोरून जोराची धडक दिली. यामध्ये दाेघांचा मृत्यू झाला. तपास दौंड पोलीस करत आहेत. अनुष्का आणि आदित्य यांचे वडील पेंटर काम करतात. त्याच्या त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे निमगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.