७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत

अहमदनगर, दि.३१ (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार, ७ मे २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाअधिक पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखल पुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत. असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष श्री. सुधाकर यार्लगड्डा व सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. सदरचे लोक अदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करणेत आले. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालती देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे.
अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, विज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्हयांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व मोटार विज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच महानगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुली प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे सहकार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तक्रार निवारण न्यायालय, कामगार न्यायालयातील पक्षकारांनी आपसी समजोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडवावीत. तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे.