डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्च पर्यंत
अहमदनगर, दि.२४ (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता अकरावी आणि बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येतात.या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.तेंव्हा पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
याकरिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ (नवीन आणि नुतनिकरण) २०२१-२२ (नवीन आणि नुतनिकरण) या वर्षातील प्रवेशित अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याकरिता २८ फेब्रुवारी २०२२ हा अंतिम दिनांक देण्यात आलेला होता. परंतु बऱ्याच अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडक स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष सन २०२०-२१ (नवीन आणि नुतनिकरण) आणि २०२१-२२ (नवीन आणि नुतनिकरण) अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ३१मार्च २०२२ करण्यात आली आहे.
या योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय उरमानाबाद येथे उपलब्ध आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या तसेच शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या पात्र अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकातील इयत्ता अकरावी तसेच बारावी व इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ३१मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.