मजुरांना टोप्या देऊन ‘स्नेहबंध’ने जपली बांधिलकी

अहमदनगर दि.२३ (प्रतिनिधी) – मार्चच्या मध्यातच तळपणाऱ्या सुर्याच्या उन्हाचा तडाख्यात मजुरांना काम करावे लागत आहे. या कामगारांचे उन्हापासून संरक्षणासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनने पुढे येत बांधिलकी जपली आहे. स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरातील कामगारांना टोप्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाची सुरुवात गृह शाखेचे पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या हस्ते डीएसपी चौकात झाली. या वेळी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिक व कामगारांना टोप्या देण्यात आल्या.
स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उद्धव शिंदे, पो. कॉ. विशाल क्षीरसागर, पो. कॉ. कैलास शिंदे, हेमंत ढाकेफळकर, चंद्रकांत गायकवाड, संकेत शेलार आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक डांगे म्हणाले, उन्हापासून बचाव होण्यासाठी प्रत्येकाने टोपी वापरावी, शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नये, तसेच सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा कामांची विभागणी केली जावी व आवश्यक काम असेल तर उन्हात बाहेर पडताना टोपीचा वापर करावा.
****
उन्हापासून संरक्षण करता यावे म्हणून राबवला उपक्रम
उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. भरदुपारी कडाक्याच्या उन्हात बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडताना, तर मजुरांना उन्हापासून आपले संरक्षण करता यावे म्हणून स्नेहबंधने हा उपक्रम हाती घेतला आहे, असे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.