महाराष्ट्रात गाजणारा नगरचा कबड्डी संघ देशपातळीवर गाजेल – किरण काळे
शहर जिल्हा काँग्रेसने केला नगरच्या विजेत्या संघाचा सत्कार

अहमदनगर दि.१८ (प्रतिनिधी ): नगरला मोठी क्रीडा क्षेत्रातील दैदीप्यमान इतिहासाची परंपरा आहे. आजच्या पिढीतील खेळाडूंनी देखील ती जपली आहे. महाराष्ट्रात गाजणारा नगरचा कबड्डी संघ एक दिवस नक्कीच देश पातळीवर गाजेल आणि अहमदनगरचे नाव मोठे करेल, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
नुकत्याच भिवंडी येथे पार पडलेल्या १७ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नगरच्या पुरुष संघाने संपादित केलेल्या घवघवीत यशाबद्दल काँग्रेस पक्षाच्या वतीने काळे यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांच्या सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
संघ प्रशिक्षक शांतनु पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघ कर्णधार शंकर भिमराज गदाई याच्या नेतृत्वाखाली लढलेल्या संघातील राहुल गोरक्ष धनवटे, राम बाळासाहेब आढागळे, प्रेम संतोष खुरंगे, संभाजी शिवाजी वाबळे, राहुल बाळासाहेब आगळे, संघ व्यवस्थापक सतीश मुरकर, विनायक भुतकर यांच्यासह अन्य विजेत्या खेळाडूंचा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या पुढाकारातून सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, मनोज गुंदेचा अनिस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जितेंद्र तोरणे, स्नेहलताई काळे, प्रशांत जाधव, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, अमृता हरिभाऊ कानवडे आदी उपस्थित होते.
यावेळी किरण काळे म्हणाले की, इस्लामपूर येथे पार पडलेल्या स्पर्धेनंतर तब्बल चोवीस वर्षांनी नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा नगरच्या संघाने रोवला आहे. या विजेत्या संघासह नगर मधील सर्व क्रीडा संघटना, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडापटू यांच्या पाठीशी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, क्रीडामंत्री ना. सुनील केदार यांच्या माध्यमातून सर्वतोपरी बळ देण्याचे काम केले जाईल. या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक क्रीडा जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांनी केले. आभार आनंदराव गारदे यांनी मानले.