ग्राहकाने आपल्या मूलभूत हक्काविषयी जागरूक राहणे आवश्यक – डॉ अजित थोरबोले
तहसील कार्यालयात जागतिक ग्राहकदिन साजरा

कर्जत प्रतिनिधी : दि १५ मार्च
ग्राहकाने अन्याय सहन करने चुकीचे असून आपल्या हक्काची माहिती करून त्यावर काम केल्यास निश्चित अधिकारी-कर्मचाऱ्यासह उत्पादक त्यास उत्तम सेवा देण्याची हमी देतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या अधिकाराबाबत कायम जागरूक राहणे बंधनकारक आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले. ते कर्जत येथे जागतिक ग्राहकदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, प्रकाश बुरुंगले, प्रकाश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक नागरिक उपस्थित होते.
मंगळवार, दि १५ मार्च रोजी कर्जत तहसील कार्यालयात जागतिक ग्राहकदिन साजरा करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी डॉ थोरबोले यांनी विविध क्षेत्रात ग्राहकांच्या हक्काची जाणीव करून दिली. ग्राहकांने शासकीय सेवा, बाजार क्षेत्रात कोणतीही वस्तु, सेवा घेताना त्याची रीतसर पावती, बील, टोकन घ्यावे जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. जेव्हा त्या वस्तुची सेवा तांत्रिकदृष्टया उभी राहते त्यावेळेस पक्के बील, पावती असल्यास त्या आधारे ग्राहकाला ग्राहकमंचात न्याय दिला जातो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने आपण सेवा घेत असताना त्याची पावती, बील घेणे आवश्यक आहे असे म्हंटले. ग्राहकाला आपल्या हक्काविषयी जागरूक करण्यासाठी सरकारद्वारा विविध उपक्रम राबविले जाते. यात जागो ग्राहक जागो, शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करून त्या हक्काविषयी जनजागृती केली जाते. ग्राहकांची फसवणूक झाल्यास १८००११४००० या राष्ट्रीय ग्राहक मदतकेंद्राच्या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात. त्या समस्येचे निराकरण करणे त्या केंद्राची जबाबदारी असते. यावेळी डॉ थोरबोले यांनी विविध शासकीय विभाग, सेतू केंद्र, स्वस्त धान्य दुकान यांच्यासह अनेक दुकानाच्या सेवाबाबत उपस्थित ग्राहकांना माहिती दिली.
यावेळी शब्बीरभाई पठाण, मधुकर दंडे, आशाताई क्षीरसागर, डॉ अफरोजखान पठाण यासह ग्राहकानी उपस्थित केलेल्या विविध प्रश्न, समस्यावर सखोल चर्चा संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी केले. सुत्रसंचालन पुरवठा विभागाचे श्रीरंग अनारसे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांनी मानले.
**** जागतिक ग्राहकदिनास इतर शासकीय विभागाची अनुपस्थिती
मंगळवारी तहसील कार्यलयात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यासाठी महसुल विभागाकडून सर्व शासकीय विभाग आणि बँकाना उपस्थिती राहण्याबाबत रीतसर पत्र पाठविण्यात आले होते. मात्र महसुल आणि पुरवठा विभागातील स्वस्त धान्य दुकान व्यतिरिक्त एक ही शासकीय विभाग आणि वित्तीय संस्था कार्यक्रमास उपस्थित नव्हते. याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अनेकांच्या तक्रारीचा निपटारा तसाच प्रलंबित राहिला. महत्वाच्या कार्यक्रमास देखील अधिकारी उपस्थित राहत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहावे असा सूर बैठकीत निघाला. याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार गैरहजर राहणाऱ्यावर काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.