कौतुकास्पदब्रेकिंग

वाढदिवसाचे अनोखे औचित्य: कॉ. प्रवीण सोनवणे यांनी केले ‘अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटल’मध्ये देहदानाचे संकल्पपत्र सादर! ​मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते व अवयवदान चळवळीच्या सहकार्यातून पुरोगामी पाऊल

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 26 मे : “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” या म्हणीला अधिक अर्थपूर्ण करत, “मरावे परी अवयवरूपी उरावे” हा नवा सामाजिक संदेश अहिल्यानगरमधील सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड प्रवीण सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिला आहे. वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता, त्यांनी ‘जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), अहिल्यानगर’ येथे जाऊन मरणोत्तर देहदान आणि अवयवदानाचा कायदेशीर संकल्प केला.
​या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर त्यांना चळवळीतील मित्र आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड दीपक पापडेजा यांनी सविस्तर माहिती व वैचारिक प्रेरणा दिली. तसेच, अवयवदान चळवळीत सक्रिय असणारे सतीश अहिरे यांनी देहदानाचा कायदेशीर कायदेकानून समजावून सांगत संकल्पपत्र (Form) अचूकपणे तयार करण्यासाठी मोलाचे सहाय्य केले.यावेळी जनशक्ती बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड संदिप सकट उपस्थित होते.
​अंधश्रद्धेच्या अंधारातून विज्ञानाच्या प्रकाशाकडे
​आजच्या विज्ञानयुगातही समाज विविध जुन्या प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकलेला दिसतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस विविध धार्मिक कर्मकांडांमध्ये व्यग्र असतो. मृत्यू पश्चात स्वर्ग किंवा मोक्ष मिळावा या आशेने अनेक विधी केले जातात. परंतु, आजपर्यंत कोणत्याही मृत व्यक्तीने परत येऊन ‘या विधींमुळे मला मोक्ष मिळाला’ असा दावा केलेला नाही. तरीही आपण मृतदेहाची केवळ जाळून किंवा पुरून विल्हेवाट लावतो. यामुळे तो देह पंचतत्त्वात विलीन होऊन नष्ट होतो.
​याउलट, जर आपण विज्ञानाची कास धरून मरणोत्तर देहदान व अवयवदान केले, तर आपण अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकतो.
​एका देहातून अनेकांना जीवनदान!
​कॉ. प्रवीण सोनवणे यांनी आवाहन करताना सांगितले की:
​नेत्रदान: आपल्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांत होणाऱ्या नेत्रदानामुळे किमान दोन ते चार अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाशाचा उजेड येऊ शकतो.
​अवयवदान: मृत शरीरातील हृदय, यकृत (Liver), मूत्रपिंड (Kidney), फुफ्फुसे (Lungs), स्वादुपिंड (Pancreas) यांसारखे महत्त्वाचे अवयव गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतात.
​त्वचा व ऊती दान (Tissue Donation): शरीरातील हाडे, हृदयाच्या नसा, त्वचा, कॉर्निया, रक्तवाहिन्या आणि कूर्चा (Cartilage) यांचा वापर वैद्यकीय उपचारांसाठी केला जाऊ शकतो.
​वैद्यकीय संशोधन: अवयवदानानंतर उर्वरित शरीर मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरते. यातूनच भविष्यातील तज्ज्ञ डॉक्टर्स घडतात, जे पुढे चालून लाखो रुग्णांवर उपचार करतात.
​”आज श्रीलंका सारखा छोटा देश अवयवदानाच्या बाबतीत जगात अव्वल स्थानी आहे. दुर्दैवाने, भारतामध्ये अजूनही याविषयी मोठ्या प्रमाणावर अज्ञान आणि अंधश्रद्धा पसरलेली आहे. परिणामी, दरवर्षी हजारो रुग्ण केवळ वेळेत अवयव न मिळाल्यामुळे रुग्णालयातच प्राण गमावतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी कॉम्रेड दीपक पापडीच्या आणि सतीश अहिरे यांच्यासारख्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी हे पाऊल उचलले आहे.”
– कॉम्रेड प्रवीण सोनवणे
​देशातील नागरिकांना भावनिक आवाहन
​”मी माझ्या २५ मे जन्मदिनाचे औचित्य साधून देहदानाचा संकल्प केला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने मरणोत्तर मोक्षाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा, मानवतेची खरी सेवा म्हणून देहदानाचा संकल्प करावा. मृत्यू पश्चातही आपल्या माध्यमातून देशाची आणि समाजाची सेवा घडत राहील, यापेक्षा मोठे पुण्य कोणते असू शकते?” असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.
​त्यांच्या या धाडसी आणि पुरोगामी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत असून, सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व उपस्थित नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
​एकच ध्यास, मानवतेचा विकास:
जिवंतपणी रक्तदान, मरणानंतर नेत्रदान, मरणोत्तर देहदान!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे