देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 17 मे: पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आणि प्रस्तावित वन उद्यानासाठी निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानण्यात आले आहेत. मात्र, पालकमंत्र्यांच्या चांगल्या हेतूला अधिकारी आणि कंत्राटदारांनी हरताळ फासू नये, असा इशारा मनसे पारनेर तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात मनसेचे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पालकमंत्री विखे पाटील साहेब यांनी कामाचा दर्जा उत्तम राखण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु, अधिकारी आणि कंत्राटदार यांना याचा विसर पडलेला दिसतो. सुपा परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई असून नागरिकांना आठ-आठ दिवस पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रस्तावित वन उद्यानाच्या ठिकाणी घोटभर पाणीही उपलब्ध नाही. मग या वन उद्यानासाठी पाणी कुठून आणणार? याचे उत्तर संबंधित विभागाने आधी द्यावे.”
जुना अनुभव विसरू नका!यापूर्वी नगर-पुणे महामार्गावरील स्ट्रीट लाईट पोलचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करून काही बालिश कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात घालवला आहे. केवळ टक्केवारीच्या मोहापोटी भविष्याचा कोणताही विचार न करता ही कामे केली गेली. पालकमंत्र्यांची दिशाभूल करून असे प्रकार पुन्हा खपवून घेतले जाणार नाहीत,” असा टोलाही पवार यांनी लगावला.
पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसताना जर हे काम रेटून नेण्याचा प्रयत्न झाला, तर माळरानावर वन उद्यान फुलण्याऐवजी केवळ बालिश कार्यकर्ते, कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पोसण्याचे काम होईल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे. जनतेच्या पैशांची अशी उधळपट्टी मनसे सहन करणार नाही.
प्रशासनाने तात्काळ या प्रकल्पाच्या पाण्याच्या स्त्रोताबाबत आणि दर्जाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मनसे पारनेर तालुका अध्यक्ष अविनाश पवार (८९७५५५९१६७) यांनी दिला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा