कौतुकास्पद

भरडधान्यांना आधुनिक रूप देत जागतिक बाजारपेठेत झेप ! उद्योजिका सरोजिनी फडतरे यांची प्रेरणादायी यशोगाथा

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. 21 एप्रिल :जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील उद्योजिका सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून भरडधान्यांवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारून स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत पोहोचवले आहे. ज्वारी, बाजरी व नाचणीसारख्या पारंपरिक धान्यांना आधुनिक उत्पादनांमध्ये रूपांतरित करत ‘समृद्धी ॲग्रो’ व ‘गुड टू ईट’ या ब्रँडद्वारे देशासह सात देशांत बाजारपेठ निर्माण केली असून राज्य शासनाकडून उत्कृष्ट महिला उद्योजिका व उत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार प्राप्त केला आहे. या उद्योगातून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांना वाढीव दर देत आत्मनिर्भरतेचे प्रभावी उदाहरण त्यांनी घडवले आहे.
गृहविज्ञान शाखेतील पदवीधर उद्योजिका सरोजिनी फडतरे यांनी २०१२ मध्ये भारतातील पहिली ज्वारीची इडली विकसित करून या उपक्रमाची सुरुवात केली. पती तात्यासाहेब फडतरे यांच्या सहकार्याने त्यांनी पोहे, चिवडा, रवा, इडली-डोसा पीठ, चकली व शंकरपाळे यांसारखी रेडी टू कुक उत्पादने विकसित केली. इंदापूर तालुक्यातील वडापुरी व देवळाली प्रवरा येथे त्यांच्या उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत.
सुरुवातीला ३० ते ३५ लाख रुपयांची उलाढाल व ४५ शेतकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा उद्योग आज सातशेहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत विस्तारला असून वार्षिक उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली आहे. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना बाजारभावापेक्षा अधिक दर दिला जातो. धान्यावर किमान प्रक्रिया करून पोषकतत्त्वे टिकवण्यावर भर दिल्यामुळे उत्पादने अधिक आरोग्यदायी ठरत आहेत. ही उत्पादने मधुमेह व लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरत आहेत.
या उद्योगामुळे स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या प्रक्रियेवर अवलंबून आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच पारंपरिक भरडधान्यांना जागतिक स्तरावर नेण्याचे काम या प्रकल्पातून झाले आहे.
उद्योजिका सरोजिनी फडतरे यांनी सांगितले की, योजनेच्या माध्यमातून उद्योग उभारता आला व स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देत उत्पादने सात देशांत पोहोचवता आली. आरोग्यदायी उत्पादनांमुळे बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. भागीदार तात्यासाहेब फडतरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वाढीव दर देत व पोषकतत्त्वे टिकवून उच्च प्रतीची उत्पादने तयार केली जात आहेत. ग्राहकांनी या उत्पादनांच्या वापरामुळे आरोग्यविषयक त्रास कमी झाल्याची प्रतिक्रिया दिली असून महिला कर्मचाऱ्यांनी या उद्योगामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत होत असल्याची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे