सात्रळ महाविद्यालयात लिंगभाव संवेदनशीलता जाणीव जागृती उपक्रम

राहुरी / प्रतिनिधी — पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे बाया कर्वे स्त्री शिक्षण व संशोधन केंद्राच्या वतीने लिंगभाव संवेदनशीलता जाणीव-जागृती उपक्रमांतर्गत वैविध्यपूर्ण विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
ऑनलाइन आयोजित केलेल्या या व्याख्यानासाठी पुणे येथील बाया कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या समृद्धी पानसे ह्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. जे. आर. सिनगर, उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. एस. एस. घोलप, उपप्राचार्य प्रा. डी. एन. घोलप. उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एन. नवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एस. भडकवाड, कार्यक्रम अधिकारी डॉ. एन.एस. कान्हे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. जे. आर. सिनगर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच सात्रळ महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
समृद्धी पानसे यांनी आपल्या विषयाला सुरुवात करताना काही चित्रफिती दाखवून विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पना आणि त्यांचे विचार समजून घेतले. शारीरिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भिन्नता असते. शारीरिक दृष्ट्या असणारे बदल आपण बदलू शकत नाही. परंतु पुरुष आणि स्त्री यांनी रूढीने ठरवून दिल्याप्रमाणेच कामे करावी असे नाही तर प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असू शकतात. याचा विचार करून समोरच्या व्यक्तीकडे बघावे, असे त्यांनी सांगितले. काळानुरूप आता पारंपरिक विचार बदलणे आवश्यक आहे. आपल्या मुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी त्यांनी अनेक उदाहरणे दिली.
सदरच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचालन प्रा. डी. एस. आगरकर यांनी केले. आभार उपप्राचार्य प्रा. डी. एन. घोलप यांनी मानले.