प्रशासकिय

प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या सोयी-सुविधांचे कार्य कौतुकास्पद:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर, दि.16 जुन (प्रतिनिधी) – निस्वार्थ भाव ठेऊन पांडुरंगाच्या ओढीने वारकरी दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरला पायी जात असतात. वारकऱ्यांप्रती संवेदना जागृत ठेऊन कर्तव्य भावनेतुन वारीदरम्यान वारकऱ्यांना अत्यंत कमी वेळेमध्ये मुलभूत सोयी-सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रशासनाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या जोडीदारांचा सत्कार, “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण, अनुकंपा उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री.विखे-पाटील बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अरुण मुंडे, भैय्या गंधे, अश्विनी थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून 260 तर परजिल्ह्यातील 27 दिंड्या जातात. या दिंड्यांमधील वारकऱ्यांना वारीदरम्यान सर्व मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या प्रशासनाला सुचना देण्यात आल्या होत्या. प्रशासनाने अत्यंत कमी वेळामध्ये चोखपणे नियोजन करुन अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला असुन वारी आपल्या दारी ही संपर्कसुची वारकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिली असल्याचेही पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
सामाजिक सदभावनेचे दर्शन पंढरपुरमध्ये होत असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, दरवर्षी आषाढी वारीसाठी 20 लाख वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात. जगभरामध्ये असा सोहळा कोठेच पहावयास मिळत नाही. वारकरी अनेक हालअपेष्टांचा सामना करत पायी चालत जातात. या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यादृष्टीने पंढरपुरमध्ये चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंढरपुर विकासाचा आराखडाही तयार करण्यात आला असुन त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात रोजगार,पर्यटनद्धीबरोबरच जिल्ह्याच्या विकासाचा सर्वसमावेश आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्याला अधिक प्रमाणात गती देण्याची गरज आहे. वाळु धोरणाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत असुन सर्वसामान्यांना अत्यंत माफत दरामध्ये वाळुचा पुरवठा करण्यात येत आहे. वाळु वितरणाची प्रणालीही अधिक सक्षम करत सामान्यांना वाळुचा पुरवठा होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. सर्वसामान्यांच्या मनातले हे सरकार असुन त्याचे प्रतिबिंब सर्वसामान्यांमध्ये दिसले पाहिजे. त्यादृष्टीने प्रशासनाने अधिकाधिक चांगले काम करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत स्वातंत्र्य सैनिक रवींद्र कवडे, स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी श्रीमती मथुराबाई माधव शेटे, श्रीमती शेख जहानआरा अब्दुल गणी, श्रीमती मालनबाई अंबादास भराट, श्रीमती शंकुतला शंकर महाले, श्रीमती सखुबाई रघुनाथ सदुपटला, श्रीमती पारुबाई गंगाराम निमसे, श्रीमती मल्लमाबाई शिवाजी जिंदम व श्रीमती मनोरमा चंद्रकांत देवकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच महसुल विभागाच्या प्रतिक्षा सुचीतील अनुकंपा धारकांना नियुक्ती आदेशाचेही वितरण करण्यात आले. यामध्ये महसूल सहायक पदी ओंकार डावखर व केतन सोबले यांना तर तलाठी पदाचे हिमालय डमाळे, सुर्यकांत रणशुर, शिला कुसळकर, नेहा जोशी व निलेश वाघ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
“शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत लाभार्थ्यांना रेशनकार्ड, दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप तसेच आपले अभिलेख आपल्या घरी या अभियानाचा शुभारंभ व वारी आपल्या दारी संपर्क सुचीचे प्रकाशनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे